10 फेब्रुवारी रोजी हळवल फाट्यावर ठिय्या आंदोलन
विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांचा प्रशासनाला इशारा
पोलीस म्हणतात सनदशीर मार्गाने मागण्या पूर्ण करून घ्या
गेली अनेक वर्ष मागणी करूनही पूर्ण होत नसेल तर लोकशाहीत आंदोलन हा सनदशीर मार्ग नव्हे का?
कणकवली : 19 जानेवारी रोजी पहाटे हळवल फाटा येथे झालेल्या आराम बसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला व काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. मात्र हा व या जागेवर अन्य अपघात होऊन देखील या ची जबाबदारी कोणावर निश्चित केली जात नाही व गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे या प्रश्नी प्रशासनाला जाग आणण्या करिता 10 फेब्रुवारी रोजी हलवलं फाटा येथे आंदोलन करण्याचा इशारा आम्ही कणकवलीकर चे विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व पोलिसांना दिला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,सदर अपघातात व यापूर्वी याठिकाणी घडलेल्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर व ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अपघात ज्या धोकादायक वळणावर होत आहे त्याठिकाणी अपघातजन्य परिस्थिती महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आहे. सातत्याने शासन दरबारी तक्रारी होऊन सुद्धा सदरच्या ठेकेदार कंपनीने अपघात न होण्याच्या दृष्टीने कोणतीही कारवाई न करता सदोष बांधकाम केल्याने याठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत व जिवीतहानी होत आहे. पर्यायाने राष्ट्राची हानी होत आहे.तरी वारंवार घडणारे अपघात कोणत्या कारणाने होत आहेत याला जबाबदार कोण याची संबंधीत यंत्रणेवर
जबाबदारी निश्चित करून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कणकवली यांना संबंधीत यंत्रणेवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश व्हावेत. अशी मागणी श्री मेस्त्री यांनी केली. 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत यावर योग्य ती कारवाई न झाल्यास दिनांक 10 रोजी शासनाला जाग आणण्याकरीता महामार्गावर हळवल फाटा येथे लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असा इशारा श्री. मेस्त्री यांनी दिला आहे. दरम्यान कलम 149 प्रमाणे श्री .मेस्त्री यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करून घ्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. परंतु गेली अनेक वर्ष याबाबत सातत्याने मागणी करून देखील जर मागण्या मान्य होत नसतील तर लोकशाहीत आंदोलन करणे हा सनदशीर ची मार्ग नव्हे का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली