सावंतवाडीच्या केशर निर्गुणची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत चमकदार कामगिरी
४७ व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद
केशर राजेश निर्गुण हीचा राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक
ब्युरो । सिंधुदुर्ग : दादर मुंबईत झालेल्या ४७ व्या राष्ट्रीय ज्युनियर कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत सावंतवाडीच्या केशर राजेश निर्गुण हिने उल्लेखनीय आणि चमकदर कामगिरी केलीय. तिचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सांघिक उपविजेतेपद तर केशरने एकेरीत तृतीय क्रमांक पटकवला.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत, बँक ऑफ़ बडोदा, इंडियन ऑईल सह पुरस्कृत 47 व्या राष्ट्रीय ज्युनियर कॅरम अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र स्काऊट आणि गाईड हॉल, दादर येथे पार पडल्या.
या स्पर्धेत ज्युनियर गटात महाराष्ट्राच्या १८ वर्षाखालील मुलांच्या संघान अंतिम फेरीत विदर्भावर 3-0 असा विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले. तर 18 वर्षाखालील मुलींच्या संघाने आपल्या गटातील उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि बंगाल यांच्याबरोबर झालेल्या लीग गटातल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत मध्य प्रदेशवर विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र महाराष्ट्राच्या संघाला अंतिम सामन्यात बलाढ्य तामिळनाडू संघाकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ज्युनियर गटात 18 वर्षाखालील मुलींच्या गटात सावंतवाडीच्या केशर राजेश निर्गुण हीने स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करून उपान्त्य पूर्व सामन्यात तमिळनाडूच्या व्ही. मित्रा हीचा 16-4, 19-1असा पराभव करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला. परंतु उपांत्य सामन्यात तमिळनाडूच्या एम. खाजिमा हिच्या कडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात केशर निर्गुण हीने पेट्रोलियम स्पोर्ट प्रमोशन बोर्डच्या आकांक्षा कदम हिच्यावर 18-7,17-21,2O-5 असा विजय मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. केशर निर्गुण हीन स्पर्धेत खेळलेल्या एकूण अकरा सामनापैकी नऊ सामने जिंकून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेतील विजेत्यांना एल. आय.सी.चे ओमप्रकाश साहू, आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव व्ही.डी.नारायण,भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव भारती नारायण बैजनाथ सिंग, फ्रान्सिस सेराव, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अरूण केदार, सचिव यतीन ठाकूर, अजित सावंत यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आल.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.