कुडाळ एमआयडीसीच्या दीर्घकालीन समस्या त्वरित सोडवा !
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश
एमआयडीसी असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
ब्युरो । कुडाळ : कुडाळ एमआयडीसीमध्ये उद्योजकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित होत्या. यासाठी गेले काही महिने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या सर्व समस्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुंबई येथील वर्ड ट्रेड सेंटर येथे कुडाळ एमआयडीसी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ एमआयडीसीच्या दीर्घकालीन समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दि. शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
इयावेळी एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची डॉ. विपीन शर्मा आणि इतर सर्व विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तब्बल एक तासांहून जास्त वेळ बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत काकूसकर,मुख्य अभियंता एस्. आर्. तुपे, प्रादेशिकअधिकारी सौ. वंदना खरमाळे तसेच कोकण विभागातील औद्योगिक महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. तर असोसिएशनचे कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर, माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, द्वारकानाथ धूरी, डॉ.व्यंकटेश भांडारी, दयानंद धुरी, राम राणे, नितीन पाटील उपस्थित होते.
विद्युत उपकेंद्र कुडाळ करीता भूखंड संपादन करण्याची प्रक्रिया गतिमान करणे, उद्योजकांची विज पुरवठ्या अभावी होणारी अडचण सोडविण्यासाठी वीस विद्युत जनित्र महामंडळाच्या कुडाळ वसाहतीत स्थापित करण्याच्या विशेष प्रस्तावावर तात्काळ पुढील कार्यवाही करणे, औद्योगिक वसाहतील जिर्ण विद्युत खांब बदलणे, अतिरिक्त वसाहतीत पथदिवे लावणे, महामार्ग रुंदीकरणात औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात गाळ भरल्याने त्याची सफाई व खोदाई करणे, दर पंधरा दिवसांनी एक दिवस सुनिश्चित करुन त्या दिवशी प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता औद्योगिक महामंडळ रत्नागिरी यांनी महामंडळाच्या कुडाळ कार्यालय येथे उपस्थित राहून उद्योजकांच्या समस्यांचा निपटारा करणे, असोसिएशनला स्मृती उद्यान उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, महामंडळाने ताब्यात घेतलेले भूखंड शक्य तेथे विभाजन करून छोट्या उद्योजकांना उपलब्ध करून देणे, दिर्घकाळ पडून असणाऱ्या भूखंडाच्या विकासासाठी विशेष निर्णय घेणे अशा महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
एम्. आय् डि. सी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने उद्योजकांच्या मांडलेल्या समस्या औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी ऐकून घेऊन अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी त्यांचे आभार मानले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.