कनेडी राड्या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या काही संशयीतांना अटकेची शक्यता?
जत्रोत्सव, आनंदोत्सव सभेचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर पोलिसांकडून हालचाली
पोलीस प्रशासनाकडून मात्र हालचालींची गोपनीयता
आंगणेवाडी जत्रोत्सवाचा पोलीस बंदोबस्ताचा पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाल्यानंतर आता कणकवली तालुक्यातील कनेडी राड्या मधील दोन्ही बाजूच्या काही संशयित आरोपींना अटकेच्या दृष्टीने कणकवली पोलिसांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्या घटने वरून दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भाजपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व पोलिसांकडून आंगणेवाडी यात्रा व भाजपाची आनंदोत्सव सभा या दोन्हीसाठी लागणारे पोलीस बळ या पार्श्वभूमीवर ही कारवाई थांबवण्यात आली होती असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र आता आंगणेवाडी यात्रोत्सव बंदोबस्ताचा ताण कमी झाल्यानंतर या राड्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचालीनी वेग घेतला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात सदर गुन्ह्यांमधील नावे नमूद असलेले दोन्ही पक्षांचे काही ठराविक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वतःहून पोलिसात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे आज रात्रीपासून किंवा उद्यापासून हे संशयित पोलिसात हजर होतील. किंवा रात्री उशिरा संशयतांना ताब्यात घेतल्याची रेकॉर्डवर दाखवले जाईल. त्या दृष्टीने पोलिसांकडून हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. दरम्यान याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप अशा हालचाली सुरू नसल्याचे सांगितले. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस दलात याबाबत हालचाली सुरू असून, आंगणेवाडी जत्रोत्सव व भाजपाची आनंदउत्सव सभा झाल्यानंतर ही नियोजित कारवाई यापूर्वी करण्यात आली होती असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिगंबर वालावलकर / कणकवली