कलमठ चे सुपुत्र ऍड. केयुर काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र ऍड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे. सतत 7 वर्षे अथक परिश्रमानंतर अखेर ऍड. केयुर काकतकर यांनी आपले ध्येय साध्य करत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. ऍड.केयुर काकतकर यांनी एमपीएससी 2021 च्या परीक्षेत हे सुयश प्राप्त केले आहे. 2 जुलै 2021 रोजी मुख्य परीक्षेत मेरिट मध्ये निवड झाल्यानंतर केयुर यांनी तोंडी मुलाखत 10 जानेवारी 2023 रोजी दिली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल 3 फेब्रुवारी रोजी लागला असून संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 62 जणांच्या यादीत केयुर यांची 26 व्या क्रमांकाने निवड झाली आहे. याबद्दल ऍड.केयुर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मुटाट येथील शाखा व्यवस्थापक दिनेश काकतकर आणि जिल्हा परिषद शाळा माईन नं 1 च्या मुख्याध्यापिका दीपा काकतकर यांचा चिरंजीव असलेल्या केयुर यांचे प्राथमिक शिक्षण करूळ येथील प्राथमिक शाळेत पार पडले. एस एम हायस्कुल मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर केयुर यांनी पदवी शिक्षण पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये 2013 साली पूर्ण केले.त्यानंतर व्हिक्टर डांन्टस लॉ कॉलेज कुडाळमधून 2016 साली एलएलबी ची पदवी घेतली. त्यानंतर 5 वर्षे कुडाळमधील प्रतिथयश वकील अजित भणगे यांच्याकडे ज्युनिअरशीप केली. सध्या ऍड. केयुर हे स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय करत आहेत. ऍड केयुर यांना पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षेत अपयश आले होते.यानंतर दुसऱ्या प्रयत्नात लेखी परीक्षा व मुलाखत होऊनही केवळ 6 गुण कमी मिळाल्यामुळे निवड झाली नाही. मात्र ऍड. केयुर यांनी खचून न जाता अधिक मेहनत घेत तिसऱ्या वेळी प्रयत्न करताना सातत्यपूर्ण सराव व लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास केला. या संपूर्ण परीक्षा कालावधीत केयुर यांना ऍड. अजित भणगे, ऍड. संदेश तायशेट्ये, ऍड. बापू गव्हाणकर, ऍड. मंगेश जाधव, ऍड. यतीश खानोलकर, औरंगाबाद येथील श्री. रवींद्र लोसरवार ,व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे प्रा.विवेक जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सोलापूर येथील आळंगेलॉ क्लासेस यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात केयुर याना आईवडील, पत्नी कोमल, बहीण केतकी यांची मोलाची साथ लाभल्याचे ऍड.केयुर यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी