नांदगाव येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची खुलेआम विक्री बंद करा

नांदगाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नांदगाव येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारुची खुलेआम विक्री गेली १० वर्षे काहीकडून सुरू आहे. या दारु अड्ड्यावर व्यसनी लोक दारुच्या नशेत नागरिकांना भर रस्त्यात शिवीगाळ करतात. त्यामुळे येथे भविष्यात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होवू शकते.अनेक पंचक्रोशीतील काही युवकांचा ही दारु पिऊन मृत्यू झाला आहे.तरी नांदगाव येथे गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची खुलेआम विक्री बंद करा,अशी मागणी नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे केली आहे.यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले, उपविभाग प्रमुख तात्या निकम,सरपंच चंद्रकांत डामरे, प्रदीप हरमलकर,राजा म्हसकर व शिवसेना नांदगाव पंचक्रोशीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनात खालील मागणी केली,त्यात कणकवली मधील मौजे नांदगाव येथे राजरोस पणे अवैध धंदे सुरु आहेत. या ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सतत ये- जा मोठ्या प्रमाणावर असते.तसेच नांदगाव एक पंचक्रोशीतील बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा आणि राज्याच्या इतर भागात प्रवास करणा-यांमध्ये महिला, तरूण मुले, जेष्ठ नागरिक यांचीही सतत प्रवाशांची वर्दळ सुरु असते. पंचक्रोशीतील नागरिकांची या ठिकाणी दैनंदिन गरजेच्या खरेदी-विक्री करिता मोठी गर्दी असते. अशा या गजबजलेल्या जागी गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची खुलेआम विक्री चालू असते कारवाई होत नाही,तसेच नांदगाव पंचक्रोशी व बाजारपेठमध्ये मोठ्याप्रमाणावर राजरोसपणे मटका चालू आहे. हे बेकायदेशीर आणि अनधिकृत गैरव्यवसाय लवकरात लवकर बंद करावे, गैर व्यवसाय विरुद्ध संबंधित लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत.
मुंबई गोवा मार्ग क्र. ६६ महामार्गासाठी बांधण्यात आलेल्या ब्रीज खाली उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेत दारू विक्रीचा अनधिकृत व्यवसाय मोठया प्रमाणात चालू आहे तसेच या जागेवरूनच पंचकोशीत सुद्धा होलसेल अनधिकृत दारू विक्रीसाठी नेण्यात येते. पंचक्रोशीतील बहुतांशी नागरीक तरूण वर्ग दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तसेच या दारू विक्रीसोबत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री अनधिकृत राजरोसपणे चालू आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे येथे हिंदू व मुस्लिम बांधव एकोप्याने व प्रेम भावनेने राहतात पण व्यसनी नागरीक दारूच्या नशेत शिवीगाळ करतात व असभ्य चुकीचे शब्द वापरले जातात त्यामुळे येथे भविष्यात जाती-जातीमधे. तेढ निर्माण होवू शकते. तसेच आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे वाहतुक व नागरिकांच्या गर्दीचे प्रमाण सुद्धा वाढत आहेत त्यात हे अनधिकृत धंदे चालू आहेत या सर्व गोष्टींमुळे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले जात आहेत. या बेकायदेशीर कृत्यांना राजकीय पाठबळ लाभत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपण स्वतः या चालत असलेले अनाधिकृत व बेकायदेशीर धंदे त्वरित बंद करावेत व असे धंदे चालवत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करावी. तसेच या ८ दिवसात आपण हे बेकायदेशीर धंदे बंद केले नाहीत किंवा धंदे चालवणाच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कार्यवाही केली नाही तर आम्ही युवा पिढी बाद होऊ नये यासाठी दि. ०४ सप्टेंबरला २०२३ रोजी पोलीस ठाणे कणकवली येथे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!