सावंतवाडी तालुक्यात दुचाकी चोरुन पलायन करणाऱ्या दांपत्याला युवकांनी पकडले ‘रंगेहात

आरोस गावठणवाडी येथील प्रकाराने खळबळ

आणखी एक दुचाकी चोरीला गेल्याची पोलिसांत तक्रार

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावात रस्त्यालगत ठेवलेल्या दोन दुचाकी चोरी प्रकरणी सावंतवाडी शहरातील एका दांपत्याला स्थानिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हुसेन राजासाब मुजावर (वय २९) व वेदीका राजेंद्र देसाई (वय २७, दोघे रा.सालईवाडा, सावंतवाडी ) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, हुसेन याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली तर वेदिका हिला समज देऊन सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोस गावठण मधली आळी येथील घरे ही रस्त्यापासून खाली दरीच्या भागात असल्याने तेथील ग्रामस्थ आपल्या गाड्या या रस्त्यावरच पार्क करून खाली घरांमध्ये जातात. वरचा रस्त्याचा भाग सुनसान असल्याने त्याचाच फायदा घेत या ठिकाणी लावलेल्या दोन दुचाकी पळवून नेण्याचा प्रयत्न सदर दांपत्याने केला. मात्र, याचवेळी गोवा येथे नोकरीसाठी जाण्यासाठी आपल्या दुचाकीपाशी आलेल्या युवकांना आपली दुचाकी कोणीतरी पळवून नेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पाठीमागून कारच्या सहाय्याने त्यांचा पाठलाग करीत त्यांना रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश देऊलकर व संदेश देऊलकर या दोन जागरूक युवकांमुळे हा चोरीचा प्रकार उघड झाला.
दरम्यान, चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले युवक व युवती हे पती-पत्नी असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली. तर त्यांच्याकडे असलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. या प्रकरणी देऊलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की गावातील योगेश सगुण देऊलकर व संदेश देऊलकर हे दोघे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोवा येथे कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. देऊलकर यांची घरे रस्त्यापासून सखल भागात असल्याने तेथील लोकांच्या दुचाकी या रस्त्याच्या कडेला सुरक्षित जागी पार्किंग करतात. मंगळवार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास योगेश देऊलकर कामाला जाण्यासाठी रस्त्यावर आला असता त्यांची गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्टार्ट करुन पळवून नेत असल्याचे त्याने पाहिले. तात्काळ त्याने आपला भाऊ संदेश यांच्या सोबतीने त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीने चोरांचा पाठलाग केला व गाडी चोरुन नेताना दोघांना काही अंतरावर रंगेहाथ पकडले. संशयित दोघेही त्यांच्या ताब्यातील एक्टिवा दुचाकीवरून आले असल्याचे सांगण्यात आले .
त्यातील एक मोटरसायकल चोरी करुन पळवून नेत होता तर एक्टिवा दुचाकी त्याच्या सोबत असलेली महिला चालवीत असल्याचे आढळून आले. तर त्याठिकाणी पार्क केलेली दुसरी मोटरसायकल चोरीस गेली आहे . या चोरटयांनी व त्याच्या साथीदारांनी चोरी केली असावी असा संशय ग्रामस्थांनी व तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तर या प्रकारानंतर धोंडू नारायण गाळेलकर (रा. आरोस गावठण मधलीआळी ) यांची सुद्धा दुचाकी चोरीला गेली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की काळ्या रंगाची त्यावर पांढरा पट्टा असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल माझी आहे ती घराजवळ आणण्याकरिता डोंगराचा चढाव असल्याने आमचे गावातील विद्यालयाजवळ रात्रीची ठेवतो. त्यानुसार २१ ऑगस्टला रोजी दुपारी बारा वाजता पार्किंग करून लावून ठेवली होती. २२ ला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी माझे घरी असताना आमच्या गावात राहणाऱ्या भिकाजी आरोसकर यांनी मला आपल्या गावामध्ये मोटरसायकल चोरणारे चोर आलेले असून त्यांना मोटरसायकल चोरून येत असताना गावातील ग्रामस्थांनी पकडले असे सांगितले. त्यानुसार मी माझ्या दुचाकी कडे गेलो असता मला माझी दुचाकी दिसून आली नाही म्हणून मी खात्री केली असता संबंधित चोरटे चोरून नेत असताना त्यांना गावातील ग्रामस्थ आणि रोखले व पोलिसांच्या स्वाधीन केले असे सांगितले. त्यानंतर आपली ही काळ्या रंगाची हिरोहोंडा स्प्लेंडर गाडी ( एम एच ०७ ए क्यू ५३६९ ) ही गाडीही गेल्याची तक्रार त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!