खैरतोडीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना वनविभागाकडून अटक

क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात केली होती खैरतोड

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील क्षेत्रफळमधील वनविभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची मूळातून खोदून तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली होती तर दोघे फरार झाले होते. या फरार दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. याबाबत सविस्तर वृतांत असा की, दिनांक १८ ऑगस्ट रोजी इन्सुली वनरक्षक संग्राम पाटील व कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांनी क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या तीन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी ताब्यात मिळाला व इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील पकडला गेलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे (३४, रा.वेत्ये) असे होते. तर गुन्हेस्थळावरून फरार झालेल्या दोन आरोपींची नावे संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे अशी होती. हे दोघेही रा.वेत्ये येथील राहणारे होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघा फरार आरोपींना वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले व तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. या अटक आरोपींना आज मंगळवारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर अटकेची कारवाई ही उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल-पृथ्वीराज प्रताप, प्रमोद राणे, वनरक्षक-संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, चंद्रकांत पडते यांनी केली.

error: Content is protected !!