मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकचे यश!

पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; विविध क्रीडा प्रकारांत पदकांची कमाई

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. १३ व १४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

या स्पर्धेत ईश्वरी त्रिंबककर हिने हर्डल्स प्रकारात प्रथम क्रमांक, तर ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सिद्धी आईर हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर अर्पिता पेडणेकर हिने २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. आयुष परब याने थाळीफेक प्रकारात प्रथम क्रमांक, तर मयुरेश परब याने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून प्रशालेच्या यशात मोलाची भर घातली.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. महेंद्र वारंग यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, सचिव श्री. अरविंद घाडी, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. प्रवीण घाडीगांवकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी पुढील स्पर्धेतही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!