गटातटाचे राजकारण करून काहीजण देवस्थाने बंद करू पाहत आहेत!
खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका
शिवसेना खा. अरविंद सावंत यांच्याकडून नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
सिंधुदुर्गात आरोग्य आणि शिक्षण यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊनच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून दिले आहे. नाटळ, हरकुळ-बुद्रुक विभागातील गरज लक्षात घेऊन हि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हि रुग्णवाहिका फक्त शिवसैनिकांसाठी नाही तर सर्वांसाठी असणार आहे. या भागात शिवसेना पुन्हा एकदा जोमाने वाढत असून आम्ही ही कॉलर पकडू शकतो हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. असे शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्याकडून शिवसेना नाटळ, सांगवे व हरकुळ-बुद्रुक विभागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी कनेडी शाखा येथे लोकार्पण प्रसंगी खा. अरविंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, सुशांत नाईक, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, आनंद आचरेकर, बेनी डिसोजा, हेमंत सावंत, रुपेश सावंत, प्रदीप सावंत, विजया कानडे, संतोष गावकर अंजली सापळे आदी उपस्थित होते. रुग्णवाहिकेच्या चाव्या खा. अरविंद सावंत यांनी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्याकडे सुपुर्त केल्या. खा. विनायक राऊत म्हणाले, गावागावात गटातटाचे राजकारण करून देवस्थाने बंद करण्याचे काम काहिजण करत आहेत मात्र आम्ही लोकांसोबत आहोत. काहींनी स्वतःचे खाजगी मेडीकल कॉलेज काढून व्यवसाय सुरू केले मात्र आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून जनतेचे हित जोपासत आहोत. याभागातील रखडलेल्या धरण प्रकल्पासाठी विशेष पॅकेजची गरज असून शेतकर्यांच्या शेतात पाणी पोहोचण्यासाठी लिफ्ट एरीगेशन सारख्या योजनांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. वैभव नाईक म्हणाले सिंधुदुर्गातील सुमारे 55 हजार नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास असून त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. जिल्हारुग्णालयात दर मंगळवारी 25 शस्त्रक्रिया होत असतात. शिवसैनिकांनी अशा रुग्णांपर्यंत पोहोचत त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करायला हवी. कनेडीतील शिवसैनिकांनी दिलेल्या लढ्याची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे असे सांगितले. शिवसेना नेहमीच 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आली आहे. या भागातील नागरिकांना आता रुग्णवाहिकेसाठी कुणाकडे वशिला लावण्याची गरज नाही. सर्वांसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. शिवसेना नेहमीच समाजाचे हित जोपासत आली आहे. असे सिंधुदुर्ग बॅकेचे माजी अध्यक्ष सतीश यांनी सांगितले. यावेळी संदेश पारकर, अतुल रावराणे यांनी मार्गदर्शन केले.
कणकवली प्रतिनिधी