कुवळे उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
ग्रामपंचायत सदस्य अनिल लाड यांचा उपोषणाचा इशारा
देवगड देवगड तालुक्यातील कुवळे येथील उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरण कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. अंदाजपत्रक व मोजमाप वहीमध्ये समावेश असलेली कामे प्रत्यक्षात जागेवर असलेले काम यात तफावत आहे. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वर्षभरापूर्वी निवेदन देवुनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या कामाची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी कुवळे ग्रामस्थांसह स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशारा कुवळे ग्रा.पं.चे सदस्य अनील लाड व ग्रामस्थांनी दिला आहे.
कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे नुतनीकरणाचे काम करताना प्रवेशद्वारावर दिव्यांग रूग्णांसाठीचा रॅम्प बांधण्यात आलेला नाही. रंगरंगोटी करताना वारली पेटींग केली नाही. बेसीन, शौचालयाच्या कामामध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. मात्र वर्षभरामध्ये आरोग्य विभागाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. नुतनीकरणाचे काम करताना अंदाजपत्रकात समावेश असलेली कामे प्रत्यक्षात केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या कामात संगनमताने भष्ट्राचार झाला असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य अनील लाड व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत चौकशी होवून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे अनील लाड व ग्रामस्थांनी सांगितले.
देवगड/ प्रतिनिधी