सिंधुदुर्ग महाविद्यालयात फ्रेशर्स साठी स्वागत समारंभ: मिस फ्रेशर मेगल डिसुझा, मिस्टर फ्रेशर प्रथम सारंग

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात 2023 – 24 या शैक्षणिक वर्षा साठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी, नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात, नुकताच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आयोजित केलेल्या या समारंभात सुरुवातीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक कैलास राबते यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच या स्वागत समारंभाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. या कार्यक्रमात प्रथम वर्ष कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ उज्वला सामंत यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील आचारसंहिते बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर भार्गवी शिरसेकर, चिन्मय तारी, वैष्णवी गावडे, ज्योती जाधव आणि मेगल डिसुझा या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “महाविद्यालयाकडून असलेल्या अपेक्षा, कॉलेज जीवनातील स्वप्ने, आणि आपले ध्येय, इत्यादी विषयी आपली मनोगते मांडली. यानंतर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी खास मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर अशी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये मिस् फ्रेशर म्हणून एफ वाय बी एस सी ची मेघल डिसूजा आणि मिस्टर फ्रेशर म्हणून एफ वाय बी कॉम चा प्रथम सारंग हे दोघे विजेते ठरले.
यानंतर प्रा. एच. एम. चौगुले, ग्रंथपाल संग्रामसिंह पवार, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. कैलास राबते, डॉ. डी. व्ही. हारगिले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संकेत बेळेकर , डॉ. उज्वला सामंत , डॉ उर्मिला मेस्त्री यांनी महाविद्यालयातील जिमखाना, ग्रंथालय, महिला विकास कक्ष, आविष्कार, वाड्मय मंडळ, परीक्षा विभाग, एन सी सी, एन एस एस, सांस्कृतिक विभाग, इत्यादी सहशैक्षणिक आणि शैक्षणिक विभागांची तसेच उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी “बदलती सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा विचार करून येणाऱ्या संधींचा फायदा घेतल्यास विद्यार्थी केवळ बेरोजगार न राहता सक्षम नागरिक बनू शकतात, त्या साठी हे महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन केले. आपल्या भाषणात त्यांनी चाकोरी बाहेरील वाटा धुंडाळून करिअर साध्य करणाऱ्या तरुणांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत शुभेच्छा दिल्या.
प्रा. प्रमोद खरात यांनी या कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचलन केले.
मालवण / प्रतिनिधी





