नेरूर कांद्रेवाडीतील निराधार महिला श्रीम.पुष्पलता नाईक यांना मिळाला संविता आश्रमचा आधार

आश्रयासाठी नेरूर ग्रामपंचायतीच्या दारात बोचकं घेवून आली होती निराधार महिला
कुडाळ – आपल्या लोकशाही देशात तीन स्तरीय ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेत जनतेच्या दृष्टीने सर्वात तळचा स्तर म्हणजे आपली गावातली ग्रामपंचायत होय. याच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लोकांच्या आशा अपेक्षांची पूर्तता करण्याचे कार्य आपले गावप्रतिनिधी करीत असतात……अशाच एका कुडाळ तालुक्यातील नेरूर ग्रामपंचायतीच्या दारात काल एक महिला श्रीम.पुष्पलता नाईक वय वर्षे (५८) ही तीचा सांभाळ करायला कोणी नाही. म्हणून तीचं बोचकं घेवून आली. आणि तीने आश्रय देण्यासाठी ग्रामपंचायतीतील प्रतिनिधी आणि कर्मचारींना विनवणी केली.
पुष्पलता या विधवा असून नेरूर गावच्या कांद्रेवाडीत त्यांचे माहेरघर आहे. ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीम.भक्ती घाडीगावकर यांनी माहिती घेतली असता त्यांचे नातलग त्यांना सांभाळण्यास तयार नसल्याचे दिसून आले. सरपंच भक्ती यांनी ग्राम पंचायतचे सदस्य श्री.मंजुनाथ सुभाष फडके यांचे सहकार्य घेतले. …श्री.मंजुनाथ यांनी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांना संपर्क करून त्यांना पुष्पलता यांच्या निराधार परिस्थीतीची माहिती दिली.वा त्यांना संस्थेच्या आश्रमात आधार देण्यासाठी विनंती केली.आज पुष्पलता यांना पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. यावेळी संविता आश्रमचे कार्यकर्ते आशिष कांबळी,जान्हवी मिठबांवकर हे उपस्थीत होते.
जीवन आनंद संस्था आणि संविता आश्रम यांचे ब्रीदवाक्यच आहे की,” ज्यांचे या जगात कोणी नाही, ते जीवन आनंद संस्थेचे,”… आज या उक्तीप्रमाणे कृती होवून एका निराधार जेष्ठ नागरिक महिलेला… पुष्पलता नाईक यांना संविता आश्रमचा आधार मिळाला आहे.
किसन चौरे,कोकण नाऊ