सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा ते तळवणे रस्ता वाहनधारकांना धोकादायक

सावंतवाडी कोंडुरा ते तळवणे-आरोंदा रस्त्याच्या एका बाजूने पाईपलाईनसाठी केलेली खोदाई वाहनचालकांसाठी धोकादायक बनत आहे. संपूर्ण माती रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय आणि या दोघांना आमदार दीपक केसरकर यांचे अभय मिळत आहे. येथून धावणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊन कोणी दगवल्यास ठेकेदार, अधिकारी व स्थानिक आमदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी दिला आहे.
कोंडुरा-तळवणे-आरोंदा परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी केलेल्या तक्रारीनुसार रस्त्याची पाहणी केल्यानंतर श्री. परब बोलत होते. पाईपलाईन खोदाईची माती रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता निर्धोक करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य होते. परंतु सहा सात महिने उलटूनही याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले.