मणेरी येथील मंदिरातील फंडपेटी पळवली

तिसऱ्यांदा चोरी; पोलिसांची भीती नसल्याने चोरट्यांचे पुन्हा धाडस
दोडामार्ग l प्रतिनिधी
पोलिसांची भीती उरली नसल्याने मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांचे धाडस वाढल्याचे चित्र आहे. मणेरी येथील श्री सातेरी मंदिरात दोनवेळा चोरी करूनही पकडले न गेल्याने त्यांनी रविवारी रात्री त्याच मंदिरातील फंडपेटी पळवली. यापूर्वी त्यांनी दोनवेळा समई, मिक्सर, घंटा अशा साहित्याची चोरी केली होती; पण त्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरल्याने त्यांनी चक्क फंडपेटीच पळवली.फंडपेटीत पन्नास हजारांहून अधिक रक्कम असल्याची शक्यता मानकरी भगवान गवस यांनी वर्तवली.
तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. तीच संधी साधून चोरट्यांनी श्री सातेरी मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य दरवाजाची दोन्ही कुलुपे आतील फंडपेटी चोरून नेली.मंदिरात सकाळी लाईट बंद करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कुलूप फोडून कुणीतरी आत प्रवेश केल्याचे पाहिले आणि चोरीची घटना उघडकीस आली.
ठसेतज्ज्ञ, श्वानपथक आले; पण…
चोरीची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ आले. त्यांनी सगळे ठसे मिळवले. त्यानंतर सायंकाळी उशिरा श्वानपथक आले; पण चोरट्यांचा माग काढण्यात पथकाला अपयश आले. पावसामुळे श्वानपथकाच्या तपासाला मर्यादा आल्या असाव्यात. तथापि, पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी होत आहे.
फंडपेटीत पैसे असल्याची माहिती
श्री सातेरी पंचायतन देवतांची पुनर्प्रतिष्ठापना आणि शिखर कलशारोहण कार्यक्रम १३ ते १६ मे दरम्यान झाला होता. त्याला कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील अन्य भागातून भाविक, नातेवाईक व चाकरमानी उपस्थित होते. त्यांनी दान केलेली रक्कम अजूनही फंडपेटीतच होती आणि त्याची माहिती चोरट्यांना होती. त्यामुळेच त्यांनी फंडपेटी पळवली. त्यावरून चोरटे माहितगार असण्याची शक्यता व्यक्त होेत आहे