केपटाऊन येथील स्थलांतरित व्हाईट टेलेड टॉपिकल सीबर्ड चा मृत्यू

आचरा–अर्जुन बापर्डेकर
केपटाऊन येथील व्हाईट टेलेड टॉपिकल सीबर्ड हा स्थलांतरित पक्षी मालवणात दोन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडून आला होता. बुधवारी या पक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२५ जून रोजी मालवण टोपीवाला हायस्कूल येथे हा जखमी पक्षी आशिष परुळेकर यांना भेटल्याची माहिती हसन खान यांनी दिली होती. त्याप्रमाणे वनरक्षक धामापूर यांनी मालवण येथे जाऊन सदर पक्षी ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी मालवण डॉ. दळवी यांचे कडे नेऊन तपासणी करण्यात आली. त्यांनी सदर पक्षाला सात दिवस देखरेख खाली ठेवण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार सदर पक्षी उपवनसंरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कुडाळ यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल मालवण यांचे देखरेखी खाली डॉक्टर दळवी यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू होते.
सदर पक्षी उष्ण कटिबंधातील स्थलांतरित पक्षी असून त्याला व्हाईट टेलेड टॉपिकल सीबर्ड संबोधले जाते. त्याच्या पायावर रिंग बसवण्यात आली होती. त्यावर केपटाऊन व 5H67529 असा नंबर होता.
सदर पक्षाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी मालवण यांचे मार्फत शव विच्छेदन करण्यात आले. पक्षाचा मृत्यू व्हाईट बेसिलरी डायरिया मुळे अंगातील पाणी कमी होऊन झाले असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी दिली आहे.




