कणकवलीत गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई
गांजा विक्री मधील सिंधुदुर्गातील साखळी समोर येण्याची शक्यता
कणकवली शहरातील नाथ पै नगर जवळील गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा एलसीबी च्या पथकाने पर्दाफाश केला. परंतु यातील एक संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात संशयित आरोपी वैभव सीताराम पांगम वय ( 25 वर्षे ), स्वप्नील सुरेश कुडतरकर (वय 30 वर्षे ), रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली ) असून यातील संशयित आरोपी रामदास पांगम हा पसार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वतः फिल्डवर उतरत ही कारवाई केली. एलसीबी पीआय भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेळके, हवालदार राजू जामसंडेकर गुरू कोयंडे, गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई 28 जून रोजी मध्यरात्री 3 वाजून 21 मिनिटांनी केली. आरोपींकडून 1 किलो 310 ग्राम चा 39 हजार रुपयांचा गांजा, एक मोटरसायकल, 2 मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोवयापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ), 20 (ब), 2 (ब) प्रमाणे कणकवली पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम राबवण्यात बाबत सूतोवाच काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. व त्यानंतर तातडीनेच ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कणकवलीतील गांजा विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.
कणकवली प्रतिनिधी




