शिक्षकांअभावी शिक्षणाची दुरवस्था हे शासन व शिक्षणमंत्र्यांचे अपयश

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर टीका
दोडामार्ग l प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाची शिक्षकांअभावी झालेली दुरवस्था म्हणजे शासन व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे अशी टीका शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संजय गवस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वास्तव परिस्थिती दाखविण्याचे काम विरोध पक्ष म्हणून शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी केले; अन्यथा शिक्षणांची अवस्था आंधळ दळत व कुत्र पीठ खातं अशी झाली असती. मुलांच्या भविष्याचा विचार करून उठविलेला आवाज म्हणजे राजकारण नव्हे. आज गावागावातील प्राथमिक शिक्षणांची अवस्था काय झाली हे प्रशासनाने पाहणे आवश्यक आहे .बदल्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.शासनाने न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही, त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना बसला.पर जिल्ह्यातील शिक्षक एकाचवेळी बदली मागून आपल्या जिल्ह्यात गेले. जिल्हापरिषदेत लोकप्रतिनिधी असले असते तर प्रशासनावर दबाव आला असता, मार्ग निघाला असता;पंरतु निवडणूका न झाल्यामुळे प्रशासनाची आम्ही म्हणू ती पूर्वदिशा अशी स्थिती आहे. तालुक्यात १३ शाळा शून्य शिक्षकी आहेत.तसेच शिक्षकांची १०० पदे रिक्त आहेत याचाच अर्थ तालुक्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था कोमात आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.तसेच तालुक्यात आवश्यक प्रमाणात पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही.फक्त मुलीना गणवेश मोफत दिला जातो , मुलांना दिला जात नाही. त्यामुळे शासनाने एक ते चार वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावा अशी मागणी पालकांतून होत आहे.काही ठिकाणी सात वर्ग असलेल्या ठिकाणी एकच शिक्षक काम करीत आहेत.ते थील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.. कामगिरीच्या गोंडस नावाखाली शिक्षणाचा गाडा हाकण्याचा केविलवाणा प्रयत्न शासन व प्रशासन करीत आहे.प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरलेले शासन, जनतेतून आवाज उठविल्या शिवाय जागे होणार नाही. शिक्षक देऊन मुलांना सक्तीचे, मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे त्यात राजकारणाचा प्रश्न उपस्थित होत नाही असेही श्री. गवस यांनी म्हटले आहे





