एका डोळ्यात डॉल्फिन रुपी हासू तर दुसऱ्यात मृत कासव रुपी आसू !

मालवण समुद्रात दोन टोकाची दोन निसर्ग रूपे
रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी व्यक्त केली चिंता
मालवण समुद्रात एकीकडे डॉल्फिनचा विहंगम विहार सुरू असताना दुसरीकडे समुद्र कासवे मृत अवस्थेत आढळली. निसर्गाची ही दोन टोक नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे एक डोळ्यात जिंदादिल डॉल्फिन साठी हसू तर दुसऱ्या डोळ्यात मानवी हव्यासापोटी मृत झालेल्या समुद्र कासवांसाठी आसू, अशी अवस्था आहे ! या भावना आहेत निलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांच्या.
सागरी जीवशास्त्रज्ञ व अभ्यासक विशाल भावे यांनी ड्रोन द्वारे शूट केलेला मालवण येथील ७५ डॉल्फिनचा व्हिडिओ पूर्ण जगात गाजतो आहे. सदर अविस्मरणीय प्रसंगाच्या वेळी उपस्थित राहण्याचे भाग्य रविकिरण तोरसकर याना लाभले. डॉल्फिनचा अथांग सागरात सुरेख असा लयबद्ध वावर डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सागरी जीवसृष्टी च्या अभ्यासानिमित्त नुकतंच विशाल भावे आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यासोबत श्री. तोरसकर यांना समुद्रात जाण्याचा योग आला होता. डॉल्फिनच्या दर्शनाने अतिशय आनंदात असतानाच दोन्ही डोळ्यातील आनंदाश्रू अचानक आटले. कारण होतं छीन्हविचिन्ह अवस्थेत सापडलेली एका मागोमाग एक अशी तीन मृत सागरी कासवे.
जेवढे जिंदादिल डॉल्फिनचे अस्तित्व आनंददायी ठरले, तेवढेच मृत सागरी कासवांचे दर्शन क्लेशदायी ठरले. नक्की त्यांचा मृत्यू कशामुळे झाला असेल याबद्दल सोबत असलेल्या पारंपारिक मच्छीमारांशी त्यांनी चर्चा केली. तसेच काही सागरी अभ्यासकांची बोलल्यानंतर, कारणीभूत ठरलेला महत्वाचा घटक म्हणजे, एलईडी लाईट फिशिंग आणि हाय स्पीड कर्नाटक ट्रॉलर फिशिंग. माणसाच्या अतिव हव्यासाची खूण असलेले हे दोन मासेमारी प्रकार. त्यांना समोर दिसलेले हे तीन मृत कासव हे फक्त प्रातिनिधिक चित्र होत. खोल समुद्रात किती कासवे जाळ्यात अडकून शेवटच्या घटका मोजत असतील त्याची गणनाचं करू शकत नाही.
एका बाजूला पारंपरिक श्रमिक मच्छीमार, कासव जाळ्यात अडकल्यानंतर जो स्वतःची जाळी कापतो आणि हातावरच पोट असताना नुकसान सोसून जाळ्यात अडकलेली सागरी कासवे परत सागरामध्ये सोडतो आहे. तर दुसऱ्या बाजूला हव्यासी आधुनिक मत्स्यव्यवसायीक (जो बऱ्याच वेळा मच्छीमार नसतो ,तो फक्त निसर्ग ओरबाडणार व्यावसायिक असतो) तो प्रखर एलइडी लाईट लाऊन मासेमारी करत सागरी कासवांचे डोळे फोडत आहे. याही पुढे जाऊन कर्नाटक येथील अतीहव्यासी आधुनिक मत्स्यव्यवसायीक जो हाय स्पीड नौका(ट्रॉलर )च्या सहाय्याने प्रचंड वेगाने मासे पकडण्याचे जाळे ओढतो, ज्यामध्ये सागरी कासवांचा आगदी फरफट होऊन मृत्यूस कारणीभूत ठरतो आहे.
रविकिरण तोरसकर म्हणाले, आम्ही या विनाशकारी मासेमारी विरुद्ध लढतो आहोत. आमचा शाश्वत मासेमारीसाठीचा अनेक दशकांचा लढा आम्ही एक ना एक दिवस जिंकणार आहोतच. पण आज रोजी मालवण समुद्रात निर्भय पणे पोहणाऱ्या ७५ डॉल्फिनच्या दर्शनामुळे एका डोळ्यात डॉल्फिन रुपी हसू तर अनधिकृत आणि विनाशकारी मासेमारी मुळे असहाय्य अवस्थेत मृत कासवामुळे दुसऱ्या डोळ्यात मृत समुद्री कासव रुपी आसू आहेत एवढ नक्की, अशी भावनिक प्रतिक्रिया रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.





