माझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी

राज्यात ६२ वरून दहाव्या क्रमांकावर झेप

नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नगरपंचायत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका आफरीन करोल, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष बांदेकर – शिरवलकर म्हणाल्या, राज्य शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ ही स्पर्धा महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर राबविली जाते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित हे अभियान १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आले होते. राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यात दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मागील वर्षी राज्यस्तरावर कुडाळचा ६२ वा क्रमांक होता.
नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर म्हणाल्या, “अभियानाच्या प्रारंभी प्रशासनाकडून संकल्पनेची सविस्तर माहिती घेऊन सकारात्मक ऊर्जेने हे अभियान राबविण्यासाठी आम्ही ठाम पाठिंबा दिला. सभागृहातून आवश्यक मंजुरी, ठराव व निधी उपलब्ध करून देत विविध उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले.”
अभियानांतर्गत कुडाळ नगरपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, शेवग्याच्या रोपांचे वाटप, महिला बचत गट व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, ई-वाहनांचे प्रदर्शन व सौरऊर्जेबाबत माहिती देण्यासाठी पर्यावरण महोत्सव, घनकचरा व्यवस्थापन, शाळांमध्ये बीजगोळे तयार करणे, प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशव्यांचे वाटप, ई-चार्जिंग स्टेशन उभारणी, रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलसंधारण, सोलर लाईट्स उभारणी, सायकल ट्रॅक निर्मिती, वॉटर ऑडिट व हवा गुणवत्ता तपासणी आदी उपक्रमांचा समावेश होता.
या कामांमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच विद्यमान मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे नगराध्यक्षा यांनी नमूद केले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कुडाळमधील नागरिक, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, संत राऊळ महाराज महाविद्यालय, शहरातील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन तसेच महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षीच्या स्पर्धेसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारणी, निर्माल्य खतनिर्मिती, सोलर लाईट्स, वृक्षलागवड, जलसंधारण, पर्यावरण महोत्सव व प्लास्टिकबंदी आदी उपक्रमांवर अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील ‘२१व्या शतकातील कुडाळ शहर’ उभारण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व दर्जेदार रस्ते आदी मूलभूत सुविधा मजबूत करण्याचे विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ शहरासाठी हा मोठा बहुमान असून भविष्यात राज्यस्तरावर सर्वोत्तम क्रमांक मिळविण्याचे ध्येय ठेवून नगरपंचायत अधिक जोमाने काम करणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!