कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण होणार!

कणकवलीत झालेल्या बैठकीत करण्यात आली चर्चा
पुतळा सुशोभीकरण समिती स्थापन करण्यावरून मतमतांतरे
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणात स्थलांतरित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व त्या आसपासच्या परिसराचे लवकर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अनुषंगाने काल गुरुवारी रात्री कणकवलीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुतळा सुशोभीकरण समिती गठित करण्याबाबत चर्चा देखील झाली. परंतु या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. या बैठकीमध्ये काही मतमतांतरे निर्माण झाल्याचे देखील समजते. मात्र पुतळा स्थापन करणारे व इतर सर्व घटक यांना एकत्रित करून लवकरच पुतळा सुशोभीकरण समिती गठित करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. या चर्चेदरम्यान काहींची जोरदार खडाजंगी देखील झाली. परंतु छत्रपतींच्या पुतळ्याचा सुशोभीकरणाचा विषय असल्याने यावर पडदा टाकण्यात आला. दरम्यान याबाबत आता लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, या पुतळा सुशोभीकरण समितीच्या माध्यमातून हे काम लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र त्याकरता पुतळा सुशोभीकरण समिती केव्हा गठीत होणार ते पाहणे असे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली