हरकुळ धरणाच्या पाण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाची तहसीलदार कार्यालयावर धडक

पाणीटंचाईची बैठक आमदारानी न घेतल्याने तालुक्यात पाणी प्रश्न निर्माण
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख शैलेश भोगले यांचा आरोप
तहसीलदारांवर प्रश्नांची सरबत्ती
हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडण्याबाबत गेले अनेक दिवस वारंवार मागणी करूनही चुकीची माहिती दिली जात आहे. अद्याप पर्यंत हे पाणी नदीपत्रात न आल्याने नदी लगतच्या नळ योजना बंद झाल्या आहेत. तर लोकांना पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र समस्या भेडसावत आहे. स्थानिक आमदार यांनी याबाबत पाणीटंचाई आढावा बैठक घेणे गरजेचे होते. मात्र ती न घेतल्याने तालुका पाणी टंचाईला सामोरा जात असल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व माजी नगरसेवक कन्हया पारकर, व तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केला. हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदी मध्ये सोडण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर धडक देत तहसीलदार आर जे पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदारांवर ठाकरे गटाच्या वतीने प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यावर तहसीलदार श्री. पवार यांनी यासंदर्भात कुणाचीही मागणी आली नव्हती असे सांगितले. त्यावर आपत्ती व्यवस्थापन चे प्रमुख म्हणून तुम्ही लोकांच्या पाण्याचा प्रश्न पाहायला नको का? येथील आमदारांपेक्षा लोकांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही व मागणीचा कसला विचार करता? असा सवाल करण्यात आला. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पाणी सोडले असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. मात्र गेले एक महिना ही उत्तरे दिली जात आहेत. केवळ उत्तरे नको पाणी जानवली पर्यंत केव्हा येणार ते सांगा. असा प्रश्न कन्हैया पारकर व शैलेश भोगले यांनी केला. त्यावर श्री. पवार यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी पाटील यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली. त्यावेळी श्री. पाटील यांनी 19 मे रोजी जानवली नदीपात्रात पाणी सोडल्याचे सांगितले. मात्र 19 मे रोजी पाणी सोडून एक महिना होत आला तरी पाणी जर जानवली पर्यंत येत नसेल तर ही नेमकी दिशाभूल कोण करतय? की आमदारांनी पाणी सोडू नको असं सांगितल असा सवाल कन्हया पारकर यांनी केला. यावेळी जल संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून किती वेगाने पाणी सोडले गेले आहे याबाबत माहिती घ्या. पाऊस पडल्यानंतर या पाण्याचा उपयोग काय? असा सवाल केला गेला. त्यावर जर नदीला बंधारे घातलेले असतील तर पाणी खाली यायला उशीर लागेल असे सांगण्यात आले. मात्र याबाबत वर वरची माहिती नको. तुम्ही स्वतः आढावा घ्या. जल संपदा अधिकाऱ्यांना सांगा. अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली.तहसीलदार श्री. पवार यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी पाटील यांना तुम्ही तात्काळ पाहणी करा व अहवाल द्या असे सांगितले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्यासह सरकारवर देखील आरोप केला. गतिमान शासन म्हणणाऱ्या या शासनाला पाणी प्रश्न सोडवता येत नसल्याची टीका तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केली.
दिगंबर वालावलकर /कणकवली