वारकरी संप्रदायावर अत्याचार करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करा

सावंतवाडीत महाविकास आघाडी व वारकरी संप्रदायाच्या वतीने सावंतवाडी तहसिल कार्यालयावर काढण्यात आला धिक्कार मोर्चा
सावंतवाडी
वारकरी संप्रदायावर अत्याचार करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी मागणी करत सावंतवाडीत महाविकास आघाडी व वारकरी संप्रदायाच्या वतीने सावंतवाडी तहसिल कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढला.
येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालय, अशी पायी वारी करत विठू नामाच्या जयघोषासह शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात करत नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत, ठाकरे शिवसेना महिला नेत्या जानवी सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, बाळा गावडे, सायली दुभाषी, मायकल डिसोजा, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, हिदायतुल्ला खान, पुरुषोत्तम राऊळ, इर्शाद बेग, ॲड. दिलीप नार्वेकर, चंद्रकांत कासार, अमिदी मेस्त्री, राघू नार्वेकर, श्रुतिका दळवी, इफ्तिकार राजगुरू, संजय लाड आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मग अशा सरकारच्या काळात सर्वसामान्य वारकऱ्यावर केला जाणारा लाठीचार्ज हिंदुत्वाला मान्य आहे का. ? तसेच हे हिंदुत्वाचे सरकार नसून देशद्रोही आणि गद्दारांचे सरकार आहे, असा आरोप आहे त्यांनी सत्ताधाऱ्यावर केला.
यावेळी जानवी सावंत म्हणाल्या, वारकऱ्यावर पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा घडवून आणलेला आहे. त्यात पोलीस बांधवांचा काहीही संबंध नाही. त्यांना हुकूम देऊन ही प्रवृत्ती घडलेली आहे. करोना काळात याच पोलिसांमध्ये वारकऱ्यांनी विठ्ठल पाहिला होता. मग अशाच विठ्ठलाकडून घडवून आणलेला लाठीचार्ज हा निंदनीय प्रकार आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो,
याप्रसंगी बोलताना ऍड. दिलीप नार्वेकर म्हणाले, जे नागरिक पंढरपुरात जाऊ शकत नाहीत ते वारकऱ्यांनाच पांडुरंगाचे रूप समजतात. त्यांच्या समोर नतमस्तक होतात. त्यामुळे पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा केवळ वारकऱ्यांवरील नसून त्याच्या वेदना विठ्ठलाला ही पोचल्या असतील, असा आरोप त्यांनी केला. तर अशा सरकारला येथील जनतेने आणि वारकरी संप्रदायाने यापुढे महाराष्ट्रात थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.