दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध
तहसीलदार आर. जे. पवार यांचे प्रतिपादन
दिव्यांगांनी वाहिली कै. रवींद्रनाथ मुसळे यांना श्रद्धांजली
कणकवली : तालुक्यातील गोपुरी आश्रम येथे बुधवारी एकता दिव्यांग विकास संस्था आयोजित कै. रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दिव्यांग मेळाव्याला साधारणपणे १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या.
सुरुवातीला कै. रवींद्रनाथ मुसळे व आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. यावेळी समाजकल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे, तहसीलदार रमेश पवार, डॉ. धनंजय रासम, डॉ. विद्याधर तायशेट्ये, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, संदीप परब संविताश्रम पणदूर, दादा कुडतरकर, परशुराम झगडे, दीपक बेलवलकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे दिव्यांग बांधव हा समाजातील एक घटक आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी प्रत्येक नागरिकाने व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे, दिव्यांगांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एकता दिव्यांग विकास संस्था कार्यरत असून त्यांचे कार्य अतुलनीय आहे. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे, या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय पातळीवर जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे अधिकारी व कर्मचारी करतील, अशी ग्वाही तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतीप्रित्पर्य एकता दिव्यांग विकास संस्थेतर्फे वागदे येथील गोपुरी आश्रमात दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. पवार बोलत होते.
अशोक करंबेळकर म्हणाले, दिव्यांगांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एकता दिव्यांग विकास संघटना कार्यरत आहे. मात्र, दिव्यांगांचे नेमके प्रश्न व समस्या काय आहेत, याचा डाटा संस्थेकडे नाही. हा डाटा संस्थेला दिव्यांगांनी दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रफुल्ल आंबेरकर म्हणाले, दिव्यांग बांधवांना मदत व सहकार्य करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटना आहेत. एकता दिव्यांग विकास संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधून दिव्यांगांच्या मदतीसाठी फंड उभा केला पाहिजे. हा फंड उभा करण्यासाठी माझे संस्थेला सर्वतोपरी सहकार्य असणार आहे. दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी सांगितले. दिव्यांगांनी आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. धनंजय रासम यांनी केले.
दादा कुडतकर यांनी एकता दिव्यांग विकास संस्थेचे कार्य कौतूकास्पद असल्याचे सांगितले. सुनील सावंत म्हणाले, दिव्यांगांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी आता लढा दिला पाहिजे. शासन दिव्यांग बांधवांना शासन तुटपूंजी पेन्शन देत असून ही पेन्शन वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी परशुराम झगडे, विनायक मेस्त्री, मनोहर पालयेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम आरंभी रवींद्रनाथ मुसळे यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काही दिव्यांगांना व्हिलचेअर, श्रवणयंत्रे, वॉकर, अंधकाठी देण्यात आली. त्याचप्रमाणे दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान विविध क्षेत्रात काम केलेल्या दिव्यांग व्यक्तींचे सत्कार यावेळी करण्यात आले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कृपा सचिन सादये (कणकवली )द्वितीय क्रमांक निधी नामदेव कोरगांवकर (शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव) तृतीय क्रमांक मानसी संतोष गरुड ( सुकळवाड ), उत्तेजनार्थ सृष्टि गणेश पटकारे (शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव ) याना प्राप्त झाला. दरम्यान पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
समाजकल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे यांनी दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या शासकीय योजनांबाबत माहिती दिली. त्यासाठी लागणारी कागदपत्रे व लाभ मिळण्यासाठी काय करावे लागते याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गुरव यांनी केले. आभार संगीता पाटील यांनी मानले. मेळाव्यास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी दीपक वारंग, मयुर ठाकूर, सचिन सादये, संतोष वारंग, राजू बावकर, बाबू राणे, बाळू मेस्त्री यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली