शिवरायांच्या ‘मोरयाच्या धोंडा’ला उपमुख्यमंत्री फडणवीसांचे अनोखे दंडवत

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे ज्या पावनस्थळी भूमीपूजन झाले ते स्थळ म्हणजे मोरया धोंडा. मालवणच्या सागरी किनाऱ्यावर असलेला मोरयाचा धोंडा तळकोकणातील किनारपट्टीच्या गाबीत समाजातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान होय. आपल्या महाराष्ट्रातील शासकीय पूजेचा मान असलेली दोन स्थाने म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि आपल्या सिंधुदुर्गातील मोरयाचा धोंडा! या ठिकाणी वर्षभर गाबीत समाजातील असंख्य भाविक आपले मनातील इच्छित व्यक्त करुन आपला कार्यभाग इथे सोपवत असतात. हा मोरयाचा धोंडा ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणच्या किनाऱ्यावर काळाचे घाव सोसत अढळपणे उभा आहे. त्याकडे वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डॉ. अमेय देसाई यांचे गाबीत समाजाचे विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू (बाबा) मोंडकर आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्न (बाळू) देसाई यांनी लक्ष वेधले. दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष मोरयाचा धोंडा या ठिकाणी भेट देत तिथे मस्तक टेकवून इथे विकासात्मक काम घडले पाहिजे असा निश्चय करत ही बाब भारतीय जनता पक्षाचे महाविजय अभियानचे प्रमुख व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे डॉ. देसाईंनी प्रामाणिकपणे मांडली. त्याचे महत्त्व लक्षात घेत आणि खरोखरच छत्रपतींच्या या ऐतिहासिक तसेच पावनस्थळाला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळावी तसेच याठिकाणी एक शिवकालीन आरमार संग्रहालयासाठी डीपीआर मंजूर व्हावा या दोन्ही बाबींसाठी आमदार भारतीयांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. योगायोग म्हणजे काल मॉरिशस येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उड्डाण करण्याअगोदर उपमुख्यमंत्री महोदयांनी या पत्रावर अनुकूल आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुशासन पर्व म्हणजे काय याचा अनुभव पुन्हा एकदा आमदार भारतीय आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनमाणसासमोर ठेवला आहे.
प्रतिनिधी, सिंधुदुर्ग