राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय आणि खुल्या गटासाठी स्पर्धा

१५ डिसेंबरपर्यंत निबंध पाठविण्याचे आवाहन

२४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये हक्क, अधिकार आणि कर्तव्यांविषयी जागृती निर्माण करणे, तसेच ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
ही स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन आणि खुला अशा तीन गटांत होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी ‘ग्राहक संरक्षण ही काळाची गरज’, महाविद्यालयीन गटासाठी ‘डिजिटल युगातील ग्राहक संरक्षण : समस्या, आव्हाने आणि उपाययोजना’, तर खुल्या गटासाठी ‘विकसित भारताच्या निर्मितीत जागृत ग्राहकांचे योगदान’ हे विषय देण्यात आले आहेत.
प्रत्येक गटासाठी अनुक्रमे ४०० ते ५००, ५०० ते ६०० आणि ६०० ते ७०० शब्दांची मर्यादा आहे. निबंध फुलस्केप कागदाच्या एका बाजूला स्वच्छ अक्षरात लिहून पाठवायचा आहे. इंटरनेट, पुस्तके किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास त्यांचे संदर्भ नमूद करणे आवश्यक आहे.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०१, ४०१ आणि ३०१ रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, वैभववाडी शाखा आणि वैभववाडी पोलीस ठाणे यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध १५ डिसेंबर २०२६ पर्यंत अध्यक्ष/सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा, घर क्रमांक ५४४, मु. पो. ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग – ४१६८१० या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, संघटक विष्णुप्रसाद दळवी किंवा सचिव संदेश तुळसणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!