समाजसेवेचा दीप उजळला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळीची अनोखी भेट

कलमठ ग्रामस्थांकडून दिविजा व संविता आश्रमाला दिवाळी फराळ, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत सुपूर्द

दिवाळीचा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि निराधार व्यक्तींच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण फुलवावेत, या सामाजिक भावनेतून कलमठ बाजारपेठेतील ग्रामस्थांनी स्तुत्य उपक्रम राबविला. दिविजा वृद्धाश्रम व संविता आश्रमातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुषांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तू संकलनाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात फराळ व वस्तू जमा केल्या.’यंदाच्या दिवाळीत आपल्या घरातील फराळ, प्रेम आणि मायेचा गोडवा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांपर्यंत पोहोचवूया!’ या भावनिक संदेशातून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. धीरज मेस्त्री यांच्या समन्वयातून शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी संकलित केलेला दिवाळी फराळ व जीवनावश्यक साहित्य दोन्ही आश्रमांच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आश्रमांना आर्थिक मदतही देण्यात आली.असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साहित्य सुपूर्द करताना आश्रमाचे व्यवस्थापक संजय शेटये यांनी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन, त्यांची काळजी आणि त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी विविध कार्यक्रमांसह हिंदू धर्मातील सण आणि उत्सवही आश्रमात आनंदाने साजरे केले जातात, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच पणदूर येथील संविता आश्रमातील निराधार महिला व पुरुषांसाठी संकलित करण्यात आलेला फराळ, जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत आश्रमाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली.या उपक्रमावेळी धीरज मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, पत्रकार तुषार हजारे, नितीन उर्फ आबा मेस्त्री, भूषण ठाकूर, सिद्धेश घाडीगावकर, प्रसाद मठकर, निखिल हजारे, राहुल कडुलकर, राज सावंत, नील लोकरे, निश्चय हुन्नरे आदी उपस्थित होते.फराळ संकलनासाठी विशेष योगदान : प्रेरणा रोहित हजारे, राणी हजारे, भूषण ठाकूर, नितीन (आबा) मेस्त्री, निश्चय हुन्नरे, शुभ्रा सिद्धेश घाडीगावकर आणि स्वरा सागर गावडे तसेच स्वामी समर्थ संघ,कलमठ यांनी विशेष मेहनत घेतली.या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या कलमठमधील सर्व देणगीदार, फराळ व जीवनावश्यक वस्तू देणारे ग्रामस्थ, संकलनासाठी परिश्रम घेणारे सहकारी, स्वामी समर्थ संघ तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण टीमच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.आपल्या घरातील आनंदाचा थोडासा वाटा गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श ठरला. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नसून प्रेम, माणुसकी आणि आपुलकीचा प्रकाश इतरांच्या आयुष्यात पोहोचविण्याचा सण आहे, हे कलमठ ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

error: Content is protected !!