शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी जिल्हा बँकेचे आर्थिक बळ; २५ जणांना कर्जमंजुरी!

शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी जिल्हा बँकेचे आर्थिक बळ; २५ जणांना कर्जमंजुरी!

दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटीबद्ध आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले. बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावांच्या मंजुरीपत्रांच्या वितरण समयी ते बोलत होते.
बांदा व मडुरा येथील एकूण २५ शेतकऱ्यांची दुग्धव्यवसायासाठी निवड करून, प्रत्येकी २ नवीन दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी सादर करण्यात आलेल्या कर्जप्रस्तावांना मंजुरी देत शेतकऱ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना बँकेपर्यंत येण्याऐवजी बँकेने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून राबविलेला हा नावीन्यपूर्ण आणि शेतकरीहिताचा उपक्रम ठरला आहे.
उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी म्हणाले की शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य, व्याजदरात सवलत आणि कर्जपुरवठ्याच्या नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन १५ हजार लिटरवरून ४० ते ५० हजार लिटरपर्यंत पोहोचले असून ही निश्चितच समाधानकारक प्रगती आहे. ही वाढ कायम ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य प्रशिक्षण, जनावरांचे शास्त्रीय संगोपन आणि व्यवसायाचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद करुन शेतकऱ्यांनी केवळ जनावरांची संख्या वाढविण्यावर भर न देता दुग्धव्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचा प्रयत्न करावा. दूध उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे, पाणी व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करावी. तसेच महागडी यंत्रसामग्री वैयक्तिक स्तरावर खरेदी करण्याऐवजी दूध संस्था व शेतकरी गटांनी सामूहिकरीत्या खरेदी करून ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी भगीरथ संस्थेचे श्री. प्रसाद देवधर यांनी दुग्धव्यवसायातील प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शास्त्रीय पद्धतीने जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन आणि सातत्याने नवनवीन बदल आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतींचा स्वीकार केल्यास दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धी साधता येईल असे त्यांनी सांगितले.
दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठावे, अशी श्री देव बांदेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करत त्यांनी या चळवळीत सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले. यावेळी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे, बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायण गावडे, दुग्ध व्यावसायिक श्री अनिरुद्ध करंदीकर , बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच बांदा व मडुरा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!