कुडाळमध्ये मोकाट गुरांसाठी १५ लाखांचा कोंडवाडा मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी

नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रयत्नांना यश

शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कुडाळ शहरातील दत्तनगर येथे मोकाट गुरांसाठी कोंडवाडा उभारण्याकरिता १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कुडाळ शहर हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच वाहनचालक, व्यापारी आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण होते.
या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे कोंडवाड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार निलेश राणे यांनी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना होण्यास मदत होणार आहे. या निधी मंजुरीबद्दल नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!