‘दीपावली प्रभात’च्या सुरेल मैफलीत कणकवलीकर मंत्रमुग्ध!

मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय गायनासह अभंग-नाट्यपदांनी रंगली संगीताची पहाट
दीपावलीच्या मंगलमय वातावरणात शास्त्रीय संगीत, अभंग आणि नाट्यपदांच्या सुरेल स्वरांनी कणकवलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली यांच्या आयोजनातून आणि गंधर्व फाउंडेशन, कणकवली यांच्या प्रस्तुतीत रविवार, ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपावली प्रभात’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या बहारदार गायनाने या संगीत मैफलीत विशेष रंग भरला.
पं. डॉ. समीर दुबळे यांचे शिष्य असलेल्या मनोज मेस्त्री यांनी सुरुवातीला ‘मियां की तोडी’ या रागाचे सुरेल सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर ‘गजानन नाम, माझे निजधाम’, ‘जय शंकरा’, ‘पंढरीचा वास’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘ध्यान करू जाता’ (रामगीत), ‘मर्म बंधातली ठेव ही’, ‘विष्णुमय जग’, ‘दैव किती अविचारी’ आणि ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ अशा विविध रचनांनी मैफलीत भक्तिरस, भावसंगीत आणि नाट्यसंगीताचा सुरेख संगम घडविला.
या कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन सिनेअभिनेते अभय खडपकर यांनी केले. संवादिनीवर संगीत अलंकार संदीप पेंडुरकर, तबल्यावर गिरीश कामत, पखवाजवर सतीश गावडे आणि तालवाद्यावर नागेश तेली यांनी समर्पक साथसंगत केली. ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी कुकारो साउंडचे संतोष सुतार यांनी सांभाळली.गंधर्व परिवाराचे सागर महाडिक,शाम सावंत,संतोष कांबळी तसेच अन्य सदस्यांनी आयोजनात महत्वपूर्ण भूमिका निभावली.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते गायक मनोज मेस्त्री तसेच सहकलाकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी विजयकुमार वळंजू , परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर,अनुराधा मेस्त्री,तेजस्विनी पेंडुरकर , ॲड.एन.आर.देसाई,पत्रकार सुधीर राणे आदी उपस्थित होते.
दीपावलीच्या पहाटे भक्तिसंगीत, शास्त्रीय गायन आणि नाट्यसंगीताचा अविस्मरणीय आनंद देणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक सुरेल पर्वणी ठरला.





