नागेश्वर मित्रमंडळाचा ‘स्वरगंध २०२६’ संगीत महोत्सव उत्साहात

दोन दिवस रंगली सुरेल गीतांची मैफल
दीपोत्सवाच्या मंगलमय वातावरणात स्वर, सूर आणि संगीताचा आनंदोत्सव अनुभवण्याची अनोखी पर्वणी कणकवलीकरांना लाभली. कणकवली-टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘स्वरगंध २०२६’ या संगीत महोत्सवाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सोमवार, ९ नोव्हेंबर आणि मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी नाना-नानी पार्क येथे सायंकाळी रंगलेल्या या सुरेल मैफिलींना संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पहिल्या दिवशी, ९ नोव्हेंबर रोजी ‘स्वरगंधार कणकवली ग्रुप’ प्रस्तुत गायक दुर्गेश मिठबावकर यांच्या संगीत कार्यक्रमाने स्वरगंधाची सुरेल सुरुवात झाली. तर दुसऱ्या दिवशी संगीत अलंकार संदीप पेंडुरकर व तेजस्विनी पेंडुरकर संचलित आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांच्या वतीने ‘दीपसंध्या’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. विविध गीतप्रकारांच्या सुमधुर सादरीकरणातून कलाकारांनी रसिकांना स्वरांच्या भावविश्वात रमविले.
या संगीत सोहळ्यात ९ नोव्हेंबर रोजी स्वामी समर्थ महिला भजन मंडळ ,कणकवली यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या सुश्राव्य भजनांचीही भक्तिरसपूर्ण जोड लाभली. दिवाळीच्या आनंदोत्सवात संगीत आणि भक्तिसुरांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे रसिकांना मिळाली.
नागेश्वर मित्रमंडळ गेली अनेक वर्षे विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबवित असून, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानातूनही मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सुधाकर ऊर्फ बंडू राणे, सामाजिक कार्यकर्ते संतोष राणे, अभय राणे, औदुंबर राणे, महेश सावंत, पत्रकार सुधीर राणे, संतोष सावंत, समीर सावंत, व्यंकटेश सावंत, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका आर्या राणे, रोहन चव्हाण, मिलिंद चव्हाण, शुभम कलिंगण, यश तेली, बाबू आर्डेकर, संदेश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अमोल पेडणेकर,विश्वनाथ चव्हाण, दिनेश मांडवकर, विठ्ठल कांदळकर, पंकज पेडणेकर, सुभाष पालव,यश पालव, निखिल साटम, संजय सावंत, संजय राणे,किरण राणे, सनीत पालव ,अमित मांडवकर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे,नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेवक बाळू पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि माजी नगरसेवक किशोर राणे,सौरभ पारकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदी मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नागेश्वर मित्रमंडळाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दोन दिवसांच्या या संगीत सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन निलेश पवार आणि बाळू वालावलकर यांनी केले. दिवाळीच्या प्रकाशपर्वात स्वरांची उधळण करीत ‘स्वरगंध २०२६’ने कणकवलीच्या सांस्कृतिक वातावरणात सुरेल आनंदाची भर घातली.






