नवउद्योजकांच्या कर्जप्रकरणांत बँकांची अडवणूक

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांची कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बँकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप
शासकीय योजनांतर्गत व्यवसायासाठी कर्ज व अर्थसहाय्य मिळवू इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवउद्योजक आणि महिला बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जप्रकरणांमध्ये अडवणूक करणाऱ्या तसेच लाभार्थ्यांना असहकार्याची वागणूक देणाऱ्या बँकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य असलेल्या पावसकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक नवउद्योजक आणि महिला बचत गट पंतप्रधान रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना तसेच खादी ग्रामोद्योग यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी व्यवसाय प्रस्ताव तयार करतात. संबंधित शासकीय विभागांकडून हे प्रस्ताव अर्थसहाय्य व कर्ज मंजुरीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठविले जातात.
मात्र, बँकांमधील काही अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांना योग्य सहकार्य करत नसून त्यांच्याशी उद्दामपणे वागत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कर्ज किंवा अर्थसहाय्य देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोपही पावसकर यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नवउद्योजकांना सहकार्य करण्याची विनंती केली, तरीही काही अधिकारी मनमानी भूमिका घेत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बँकांच्या अशा नकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील नवउद्योजक आणि बचत गटांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने ते उद्योग-व्यवसायापासून दूर जात आहेत. याचा परिणाम जिल्ह्यातील स्वयंरोजगाराच्या संधींवर होत असून सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे पावसकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील नवउद्योजक आणि महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जप्रकरणांमध्ये अडवणूक करणाऱ्या आणि लाभार्थ्यांना सहकार्य न करणाऱ्या बँकांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.






