मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने झिजवला देह

बाळाजी सारंग यांचे देहदान
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्त
बाळाजी सारंग मूळचे सिंधुदुर्गचे
ब्युरो । पुणे : रक्तदान, अवयवदानाकडे कल वाढत आहे. मात्र, रूढी-परंपरांमुळे देहदानात अडचणी येतात. आत्म्याला शांती मिळणार नाही, या भीतीने कुटुंबीय देहदान करत नाहीत. मात्र, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले शिक्षक बाळाजी हरी सारंग यांनी मरणोत्तर देहदान केले आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. जिवंतपणी त्यांनी आपला देह शिक्षणासाठी झिजवला व मृत्यूनंतरही या देहाचा उपयोग व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून वयाच्या सत्तरीतच त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या इच्छेनुसार नुकतेच त्यांचे पार्थिव डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्त केले. जुनी सांगवीत बाळाजी सारंग राहत होते. पुण्यातील खासगी क्लासेसचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. जवळपास ३० वर्षे त्यांनी आँध आय. टी. आय. येथे गणित आणि विज्ञान विषयाचे प्रशिक्षक म्हणून काम केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी २००९ मध्ये देहदानाचा अर्ज केला होता. बाळाजी सारंग हे मूळचे कुडाळ तालुक्यातील बाव गावचे. त्यांचा हा देहदानाचा निर्णय समाजाला निश्चितच मार्गदशक आहे.
थोडं देहदानाविषयी….
असे करता येते देहदान –
■ व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचे दान करण्यात येते.
■ देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो.
■ मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो.
■ देहदानाचे अर्ज मेडिकल कॉलेजच्या शरीर रचनाशास्त्र विभागाकडे उपलब्ध आहेत.
■ नागरिकांनी अर्ज भरून जवळच्या नातेवाइकाची सही घेतल्यास देहदान करणे सोपे जाते.
■ अर्ज भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जवळच्या नातेवाइकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही.
■ अर्ज भरला नसेल मृत्यूनंतर जवळच्या नातेवाइकांनी देहदान करण्याची. इच्छा व्यक्त केली तर देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे.
शरीर हे क्षणभंगूर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवरुपी जिवंत रहायचे असेल तर अवश्य दान करा, असा संदेश माझ्या वडिलांनी दिलेला आहे. देहदान करून मृत्यूनंतरही शिकाऊ ‘डॉक्टरांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडावे, असा त्यांचा मानस होता.असे बाळाजी सारंग यांचा पुत्र ‘हृषिकेश सारंग, यांनी सांगितले.
देहदान करण्यासाठी सोपी पद्धत आहे. देहदानाची इच्छा असणान्याने जवळच्या नातेवाइकांची सही घेऊन जवळच्या मेडिकल कॉलेजकडे अर्ज करावा. शरीराला जंतूसंसर्ग, एचआयव्ही, कोरोना आणि क्षयरोग आदी आजार असेल तर, देहदानाचा उपयोग होत नाही. असे डॉ. प्रीती सोनजे, विभाग प्रमुख, शरीर रचनाशास्त्र, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांनी सांगितले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, पुणे.