कणकवली तालुक्यातील सुमारे 8 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी 5 हजार अग्रीम रक्कम मिळणार!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाची एकत्रित कार्यवाही
फार्मरआयडी संदर्भात समस्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी गट नंबर संलग्न करून घ्या
दुष्काळी स्थितीचा पहिला टिगर कोकणात लागू झाल्यानंतर दुष्काळग्रस्त भात पिकांचे पंचनामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम स्वरूपात 5 हजार रुपये देण्याकरिता कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह प्रशासन गेले काही दिवस कामाला लागले आहे. सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना अग्रीम देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती श्री देशपांडे यांनी दिली. मात्र ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फार्मरआयडीला अन्य दुसऱ्या गावात जमीन असल्यास तेथील गट नंबर जर सलग्न नसतील तर ही नुकसान भरपाई मिळताना अडचण ठरणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जर दोन गावांमध्ये स्वतंत्र गट नंबर हे नुकसानग्रस्त भात शेती करिता पंचनामा झाला असेल तर हे फार्मरआयडी ला संलग्न करणे गरजेचे असल्याचेही श्री देशपांडे यांनी सांगितले. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये गेले काही दिवस श्री देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, महसूल व ग्रामविकास विभाग यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत तहसीलदार कार्यालयामध्ये याकरिता एक स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त पंचनामे करण्याकरिता जबाबदारी दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत एकत्रित समन्वय साधण्यासाठी तहसीलदारांच्या कक्षामध्ये हे काम सुरू करण्यात आले आहे. नुकसानग्रस्तांना अग्रीम 5 रुपयाची रक्कम देत असताना या अनुषंगाने फार्मर आयडी सोबत नुकसानग्रस्त गट नंबर संलग्न आहे का? हे तपासण्या सोबतच अन्य बाबींची तपासणी देखील या ठिकाणी केली जात आहे. मात्र ज्यांचे फार्मर आयडी काढलेले नाही त्यांना मात्र ही भरपाई मिळणे अडचणीचे होणार आहे. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकरी या अग्रीम रकमेपासून वंचित राहू नये या दृष्टीने काम सुरू करण्यात आल्याची माहिती श्री देशपांडे यांनी दिली. दरम्यान कणकवली तालुक्यातील सुमारे 8 हजार नुकसानग्रस्त शेतकरी असून यातील काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढून घेण्याची गरज असल्याचे देखील श्री देशपांडे यांनी सांगितले.






