स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्यावर कारवाई करा !
नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा काल, २५ एप्रिल २०२३ रोजी ११ वा. कुडाळ नगरपंचायत सभागृहात बोलविण्यात आली होती. या सभेस स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे हे दुपारी १२ वाजल्यानंतर उपस्थित झाले. नगरपंचायत हजेरी बुकावर सही करत असताना मागील ५ अनुपस्थित सभेच्या हजेरी बुकावर सह्या केल्या लक्षात आल्यावर आपण विरोधी भाजपा गटनेते यांना याबद्दल विचारणा केली असता स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे माझ्या अंगावर धावून येत हातवारे करु लागले. त्यावेळी सदरचा प्रकार घडत असताना नगरपंचायत मुख्याधिकारी, सभाअधिक्षक, सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित हा प्रकार घडला.
या व्यक्तीने कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी नितिन गाढवे यांच्या अंगावर धावून जात खुर्ची मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या होत्या. या प्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल असून सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रवीष्ठ आहे. सदर व्यक्तीने स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीवेळी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे अर्ज बाद झाला होता. सदर व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार केला असता आपण कुडाळ शहराची प्रथम नागरिक असून एक महिला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या बाबतीत जो प्रकार घडला तसा प्रकार माझ्या बाबतीत घडेल याची शक्यता नाकारता येत नाही. सदर व्यक्तीपासून माझ्या जिवास धोका आहे. तरी सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, किरण शिंदे, संतोष शिरसाट, नगरसेविका सई काळप, अक्षता खटावकर, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अल्पसंख्यांक सेलचे तबरेज शेख आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कुडाळ