पाणीटंचाई आराखडा ६.७१ कोटींचा, मात्र दुष्काळावर विशेष चर्चाच नाही

कुडाळ पंचायात समिती सभा

दुष्काळावर एकजुटीने मात करूयात – सीताराम तेली

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई आढावा बैठकीत ३ कोटी ७७ लाखाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असली तरी आमदार निलेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार अजून काही कामी या टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या सोमवारी एकूण ६ कोटी ७१ लाखांचा कुडाळ तालुक्याचा पाणी टंचाई आरखडा सादर तयार करण्यात आल्याची माहिती आज कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत देण्यात आली. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना बाबत सभागृहात फारशी सकारत्मक चर्चा होणं अपेक्षित होत पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून बंधारे बंधने या व्यतिरिक्त फारशी चर्चा झाली नाही. उपसभापती सीताराम तेली यांनी मात्र शेवटी आभार प्रदर्शन करताना मतभेद आणि पक्षभेद विसरून एकजुटीने दुष्काळाचा सामना करूया असे आवाहन मात्र केले.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आज झाली. यावेळी उपसभापती सीताराम तेली, गट विकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, प.स. सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची ट्रिगर १ परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, तसेच ग्रामस्थ, विविध संस्था, पत्रक यांच्या कडून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरु आहे. कुडाळ तालुक्याला १६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत २५ टक्के काम झाल्याचे कृषी विभाग प.स. यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच तालुक्यातील ४ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रावरील ७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच ७ हजार २०० महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत १२६ महिला शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र दिल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान माणगाव-पेडणेकरवाडी येथील जलजीवनचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे ते पूर्ण कधी होणार असा प्रश्नसदस्य योगेश धुरी यांनी विचारला. त्यावर ठेकेदार काम करायला बघत नाहीत असे उत्तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आले. जलजीवनचा निधी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावठी बाजारात राजकारण – अर्चना बंगे

कुडाळ मध्ये असलेल्या गावठी बाजारात बचतगटाच्या महिलांना स्टॉल लावण्यासाठी आठवड्याचे उरलेले सहा दिवस तिथे जागा ऊपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदस्य अर्चना घावनळकर या गेल्या काही मासिक सभांमधून करत आहेत. आजच्या सभेत देखील त्यांनी आपल्या या मागणीच काय झाले अशी विचारणा केली. त्यावर झालेल्या चर्चेत गावठी बाजारामध्ये ठरविक भागातील महिलांच स्थान दिले जाते असा गंभीर आरोप समस्या अर्चना बंगे यांनी केला. त्याला दुजोरा देता अर्चना घावनाळकर यांनी सुद्धा या गावठी बाजारात माझ्या मतदारसंघातील महिल दिसत नाहीत असे सांगितले. त्यासाठी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करून यावर तोडगा काढूया अशी सूचना केली.

पोषण आहार आचारी मानधन १० हजार करा !

सध्या पोषण आहार शिजवणाऱ्या आचाऱ्याना दरमहा अडीज हजार मानधन मिळते. कधी कधी ते वेळेत सुद्धा मिळत नाहीत. ते वेळेत मिळावे अशी मागणी सभागृहात केली. त्याही पुढे जाऊन सभापती मिलिंद नाईक यांनी पोषण आहार आचाऱ्याना महिना दहा हजार मानधन मिळावे असा ठराव मांडला.

कसाल बस स्थानकावरील खड्डा ठरला कळीचा मुद्दा !

आजच्या सभेच्या सुरुवातीलाच एसटी प्रशासनाचा आढावा घेताना सदस्य संतोष कांदळकर यांनी बस स्थानकात पडलेल्या खड्ड्ड्यांवरून एसटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मातीने खड्डा भरण्याचे काम आपण थांबवले असताना अधिकारी खड्डा भरल्याचे कसे काय सांगू शकतात, असा प्रश्न विचारून त्यांनी त्या कामाचा फोटोच सभापतींना दाखवला. थातुर मातुर उत्तरे देऊन नका असे सभापती मिलिंद नाईक यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सुनावले. पुढच्या मिटींगच्या आत हे काम पूर्ण करा अशा सूचना सभापतींनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान नवीन एसटी थांबे सुरु करण्यासाठी किती दिवसांची मुदत असते असा प्रश्न सदस्य संतोष कांदळकर आणि योगेश धुरी यांनी विचारला. त्याला एसटीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरची मागणी सदस्य श्रावणी तेरसे यांनी केली. कसाल जि प शाळा नंबर १ मध्ये कॉम्प्युटर शिक्षणासाठी आयसीटी लॅब उभारण्यात येते आहे. त्यासाठी ४५ लाखाचे साहित्य शाळेत आलेले आहे पण शाळेला योग्य सुरक्षा नसल्याने सामानाची चोरी होऊ शकते याकडे सदस्य संतोष कांदळकर यांनी लक्ष वेधले. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी जाऊन त्याठिकाणी पाहणी करावी अशी सूचना केली.

पोषण आहारात लवकरच मालवणी मसाले

पोषण आहारात लवकरच स्थानिक मसाल्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी सदस्य मंगेश प्रभू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. प्रभू यांनी पुरवठादार पुरवठा करत असलेले मसाले स्थानिक नसल्याने ते वापरून केलेला पोषण आहार विद्यार्थी खात नाहीत. त्यापेक्षा ते मसाले फुकट जातात, याकडे लक्ष वेधले. त्यावर सभापती मिलींद नाईक यांनी सांगितले कि शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. स्थानिक पुरवठादार नेमण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. ती मान्य करण्यात आली असून लवकरच पोषण आहारात मालवणी मसाले दिसतील.

माणगावात वीजबिलावर मीटर ‘उपलब्ध नाही’ ?

माणगाव मध्ये वीजग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजबिलावर रिडींगच्या जागी जुने मीटर चालू स्थितीत असतानाही ‘उपलब्ध नाही’ असा शेरा मारला जातो, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. येणारी वीज बिले सुद्धा ५ ते दहा हजारांच्या घरात येतात. महावितरणकडे चौकशी केल्यावर ते स्मार्ट मीटर बसवा असे सांगतात. म्हणजेच जुने मीटर चालू असताना केवळ स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरण असे करत असल्याचा आरोप धुरी यांनी केला.

संपूर्ण सभेत दुष्काळाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. पण केवळ जुजबी बंधारे माहिती, नुकसानी पंचनामे माहिती या व्यतिरिक्त दुष्काळाबाबत सभागृहात कोणतीच चर्चा झाली नाही. पण उपसभापती सीताराम तेली यांनी सभेचा समारोप करताना दुष्काळाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. हि परिस्थिती कठीण असून सर्वानी आपापसातले मतभेद, पक्षभेद विसरून खांद्याला खांदा लावून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा असे आवाहन केले.

error: Content is protected !!