तुळशीदास रावराणे यांना वसंतराव स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार

भाजप शिक्षक आघाडी, कोकण विभागाच्या वतीने पुरस्कार जाहीर

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत शिक्षणभूषण तुळशीदास तुकाराम रावराणे यांना भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी, कोकण विभागाच्या वतीने मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ‘वसंतराव स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
तुळशीदास रावराणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना मानपत्रात त्यांच्या तेजस्वी, तडफदार आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा तसेच परखड व स्पष्टवक्तेपणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. सरपंच, क्षेत्र कोणतेही असो, शैक्षणिक असो, व्यवस्थापकीय असो, सांस्कृतिक असो वा सामाजिक, आपल्या अफाट कर्तृत्वाचा, अनुभवाचा आणि नेतृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला आहे.
भविष्यवेधी नजर, नवनवीन क्षेत्रे धुंडाळण्याची वृत्ती, आव्हानांना पेलण्याची क्षमता आणि शिक्षण हाच ध्यास व शिक्षण हाच श्वास मानून त्याचे संपूर्ण रूपांतर करण्याची त्यांची कार्यशैली शिक्षण क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संस्थापक-अध्यक्ष पदाची गरिमा, महती आणि महिमा समर्थपणे जपत शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही गौरवोद्गार काढण्यात आले आहेत. कर्तव्य बजावताना निर्णयक्षमता, सत्याची कास धरण्याची वृत्ती, तत्त्वनिष्ठा आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा या गुणांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
या सन्मानपत्रावर आमदार तथा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सहसंयोजक सुधीर घागस, कोकण विभाग संयोजक ए. एस. भामरे आणि प्रदेश सहसंयोजक किशोर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच भाजप शिक्षक आघाडी, कोकण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रावराणे यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे तुळशीदास रावराणे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तुळशीदास रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष सक्रियपणे काम केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठवला आहे. शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे काम अग्रेसर राहिले आहे त्यामुळे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!