जात पडताळणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन; ६० दिवसांत निर्णयाचे उद्दिष्ट

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची सुविधा
प्राजक्त चव्हाण यांची माहिती
राज्यातील विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार, निवडणूक लढविणारे इच्छुक तसेच शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. यामुळे अर्जदारांना कागदपत्रांच्या प्रती घेऊन जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख अ.जा. प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे, त्रुटींची पूर्तता करणे आणि अंतिम निर्णयाची माहिती मिळविणे शक्य होणार आहे. अर्जदारांच्या मार्गदर्शनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नव्या व्यवस्थेनुसार जात वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि प्रतिज्ञापत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या प्रतींची प्रिंट काढून पुन्हा समिती कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. आधार क्रमांकाशी अर्ज प्रक्रिया जोडण्यात आली असून, एका अर्जदाराला एकच अर्ज करता येणार आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर समिती कार्यालयाकडून त्याची प्राथमिक तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जात त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन सूचना दिल्या जातील. आवश्यकतेनुसार संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल किंवा प्रकरण दक्षता पथकाकडे चौकशीसाठी पाठविले जाईल. सुनावणीची आवश्यकता भासल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. विशेष परिस्थितीतच प्रत्यक्ष सुनावणीची परवानगी दिली जाऊ शकते.
अर्जदाराचा जात दावा आणि आवश्यक पुरावे योग्य आढळल्यास समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित केले जाईल. जात दावा अवैध ठरविण्यापूर्वी अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची आणि सुनावणीची संधी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अर्ज प्राप्त झाल्यापासून शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दोन महिन्यांची संधी दिली जाणार असून, पाचव्या महिन्यात अंतिम ऑनलाइन सुनावणीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. समितीचा निर्णय SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे अर्जदाराला कळविण्यात येणार आहे.
नव्या प्रणालीअंतर्गत शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी १ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सेवाविषयक प्रयोजनासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्यास १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या सुविधेसाठी शासनाने https://www.cvc.barti.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार असून, जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होईल, असे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले.






