ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने कार उलटली

पिंगुळी-पाट मार्गावर अपघात
मोठी जीवितहानी टळली
पिंगुळी-पाट मार्गावरील माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयानजीक शुक्रवारी सकाळी कार उलटून अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या गटारात जाऊन एसटी बसथांब्याच्या भिंतीला धडकली आणि उलटली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून परुळेच्या दिशेने जाणारी ही कार शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयानजीक आली असता चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने उलटलेली कार पुन्हा उभी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.






