करूळ चे माजी सरपंच दत्तात्रय फोपे यांचे निधन

उद्या करूळ येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
काँग्रेस विचारसरणीचे कार्यकर्ते म्हणून होती ओळख
सलग 29 वर्ष सरपंच पदाची सांभाळली होती धुरा
कणकवली तालुक्यातील करूळ गावचे माजी सरपंच व तात्कालीन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दत्तात्रय देऊ फोपे (वय सुमारे 85) यांचे आज वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. त्या काळात सलग 29 वर्षे सरपंच राहून गावच्या विकासामध्ये दत्तात्रय फोपे यांचे मोठे योगदान दिले होते. सलग सरपंच राहण्याची त्यांच्या नावावर रेकॉर्ड होते. त्या वेळचे अभ्यासू व दरारा असणारे सरपंच म्हणून त्यांची तालुका पातळीवर ओळख होती
. आदर्श गावासहित, निर्मल ग्राम असे अनेक पुरस्कार त्यांच्या कारकीर्दीमध्ये करूळ ग्रामपंचायततिला मिळाले होते. शासकीय योजनांचा पुरेपूर अभ्यास असल्याने अधिकाऱ्यांना या अभ्यासाच्या जोरावर काम करायला भाग पाडणे अशी त्यांची खासियत होती. करूळ रामेश्वर सोसायटीचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले होते. सरपंच नसताना देखील त्यांना तालुका व जिल्हा पातळीमध्ये फोपे सरपंच या नावाने ओळखले जायचे. सुरुवातीच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. निवडणुकीच्या वेळी गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन काँग्रेस वाढीसाठी त्यांचे योगदान होते. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील त्यांनी काही काळ सक्रियपणे काम केले. काँग्रेस विचारसरणीचे असले तरी सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. राजकारणातील त्यांचा गाढा अभ्यास होता. गेले काही दिवस ते आजारी होते. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली सुन, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या करूळ येथील स्मशानभूमीमध्ये सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिगंबर वालावलकर कणकवली






