सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंदूक परवाना नूतनीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन

परवाना मुदत संपणाऱ्या शस्त्रधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील बंदूक परवानाधारकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवाना नूतनीकरणासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर नोटीस द्वारे केले आहे.
शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयामार्फत तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत संबंधित तालुक्यांमध्ये होणार आहेत.
तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
सावंतवाडी : १, २ व ३ डिसेंबर २०२६
दोडामार्ग : ४ व ७ डिसेंबर २०२६
वेंगुर्ला : ८, ९ व १० डिसेंबर २०२६
कुडाळ : ११, १४ व १५ डिसेंबर २०२६
मालवण : १६, १७ व १८ डिसेंबर २०२६
कणकवली : २१, २२ व २३ डिसेंबर २०२६
देवगड : २४, २८ व २९ डिसेंबर २०२६
वैभववाडी : ३० व ३१ डिसेंबर २०२६
नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे
शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील Form A-3 अर्ज पूर्ण माहिती व छायाचित्रासह सादर करणे आवश्यक आहे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा जिल्हा शल्यचिकित्सक यांचे S-3 नमुन्यातील प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
याशिवाय Form S-8 संबंधित पोलीस निरीक्षकांची सही व शिक्क्यासह, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र, सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड आणि मूळ शस्त्र परवान्याची प्रत जोडणे आवश्यक आहे.
परवाना नूतनीकरणासाठी पाच वर्षांकरिता २,५०० रुपये शुल्क शासन जमा करणे आवश्यक आहे. नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विलंब झाल्यास सबळ पुराव्यासह अर्ज सादर करावा लागणार आहे.
Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज पोस्टाद्वारे अथवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेला शस्त्र परवाना पोस्टाने पाठविला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी तालुकानिहाय दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील परवानाधारकांनी निश्चित केलेल्या तारखेला व वेळेत शस्त्र परवान्यासह उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.






