लिंगायत समाजातर्फे बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले जगद्गुरु बसवेश्वरांना अभिवादन
सायंकाळच्या सत्रात होणार महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम
लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाजाच्या समाज मंदिराच्या जागेत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
यानिमित्त सकाळी ११ वा.श्री.गणेश पूजा, श्री.बसवेश्वर प्रतिमेचे पूजन तर १२ वाजता श्री बसवेश्वर महाराज जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा गीत गात बसवेश्वर मूर्तीस पाळण्यात घालत पाळणा गीत म्हटले. यावर्षीची पूजा निखिल घेवारी व नेहा घेवारी या सपत्नीकांच्या हस्ते जंगम स्वामींच्या उपस्थितीत करण्यात आली.दरम्यान या सोहळ्यास फटाक्यांची आतीषबाजी तसेच श्री. जगद्गुरु बसवेश्वर महाराज यांचा जयघोष ही करण्यात आला.
हा सोहळा पाहण्यासाठी लिंगायत समाज बांधव तसेच शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाआरती, तीर्थप्रसाद देण्यात आला. महात्मा श्री बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कांबळे गल्ली येथील लिंगायत समाज मंदिर नियोजित जागेत भव्य दिव्य मंडप,विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर,कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर,प्रतिष्ठित व्यापारी आनंद पोरे,प्रसाद अंधारी यांनी जयंती उत्सवाला भेट देत महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत लिंगायत समाजबांधवांना बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान कणकवली तालुका पत्रकार समितीच्या उपाध्यक्षपदी अनिकेत उचले यांची निवड झाल्याबद्दल व जयंती उत्सवाचे नियोजन केल्याबद्दल अध्यक्ष श्रीरंग पारगावकर, नंदकुमार उचले, नागेश पारगावकर यांचा सत्कार करण्यात आला.मिथेश मिठारे यांनी जगद्गुरु बसवेश्वर महाराज यांच्या बद्दलची माहिती सविस्तर बांधवांना दिली.
सायंकाळाच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम,फनी गेम्स स्पर्धा, बसवेश्वर महाराज यांच्या विचारावर प्रबोधन करणार असून याला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश घेवारी यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी