कुडाळमध्ये MPSC-UPSС मार्गदर्शन केंद्रासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार

ऑक्टोबर मध्ये घेणार मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट
सिनेट सदस्यांकडून नियोजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन कुडाळमध्येच उपलब्ध व्हावे आणि या भागातून अधिकाधिक वर्ग-१ अधिकारी घडावेत, यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पुढाकार घेतला आहे. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्याची मागणी त्यांनी सिनेट सदस्यांकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ऑक्टोबरमध्ये कुलगुरूंची भेट घडवून आणण्याचे आश्वासन सिनेट सदस्यांनी दिले आहे.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मंदार शिरसाट यांनी कुडाळ व सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या सिनेट सदस्यांसमोर मांडल्या. पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना जावे लागते. त्यामुळे ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार पडतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन कुडाळमध्येच दर्जेदार मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
“सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांचा आधार घ्यावा लागतो. कुडाळ व परिसरातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ग-१ अधिकारी व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकृत मार्गदर्शन केंद्र कुडाळमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे मंदार शिरसाट यांनी सांगितले.
सिनेट सदस्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
या मागणीची मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा गवळी आणि मयूर पांचाळ यांनी सकारात्मक दखल घेतली. कुलगुरूंसोबत बैठक आयोजित करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून रेल्वे व बस वाहतुकीने जोडलेले आहे. त्यामुळे कुडाळमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकतो, अशी भूमिका शिरसाट यांनी मांडली. केंद्रासाठी आवश्यक जागा व स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरूंच्या भेटीत सविस्तर प्रस्ताव सादर करणार
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या आगामी भेटीदरम्यान कुडाळमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन, सविस्तर प्रस्ताव आणि केंद्राच्या संभाव्य आराखड्याची माहिती सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, आत्मविश्वास कसा वाढवावा आणि करिअरच्या विविध संधींची निवड कशी करावी, यासाठी मंदार शिरसाट यांनी यापूर्वी विविध मार्गदर्शन सत्रे व तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने कुडाळमध्ये कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असावे, या उद्देशाने आता विद्यापीठ पातळीवर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.





