गणेशोत्सव काळात कणकवली शहरातील वाहतुकीत बदल

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांनी आदेश दिल्याची पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांची माहिती

१२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

कणकवली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी वाहतूक नियमनाबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कणकवली शहरातील काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वाहतूक वाढणार असून, कणकवली शहर तसेच परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, अपघात टाळता यावेत आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी :
पटवर्धन चौक, कणकवली येथून कलमठ मार्गे आचरा जाणारी तसेच आचरा-कलमठ मार्गे कणकवलीकडे पटवर्धन चौकात येणाऱ्या अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
हलके व इतर वाहनांसाठी पर्यायी मार्ग :
पटवर्धन चौक, कणकवली ते लक्ष्मी चित्रमंदिर (कलमठ मार्गे आचरा जाण्यासाठी) ते कलमठ मार्गे कणकवली बाजारपेठ असा मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर हलक्या व इतर वाहनांनी लक्ष्मी चित्रमंदिर ते किनई रोड, गांगोमंदिर मार्गे कणकवली बाजारपेठ असा पर्यायी मार्ग वापरावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या वाहतूक बदलातून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आली आहेत.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!