उत्सव साजरे करा; पण नागरिकांच्या शांततेचा भंग नको !

ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी व आपत्कालीन सेवांच्या अडथळ्यावर कठोर नियमांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उत्सव सण जयंती दिनविशेष व मिरवणुका साजरे करताना ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण व आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नागरिकांच्या सही मोहिमेद्वारे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकरी मच्छिन्द्र सुकटे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनावर १८१ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी जिल्हा संघटक श्री. दळवी सर, सिंधुदुर्गनगरी अध्यक्ष श्रीराम चव्हाण, कुडाळ अध्यक्ष प्रदीप शिंदे, सिंधुदुर्गनगरी संघटक सूर्यकांत पाटील व कोषाध्यक्ष राजन वालावलकर आणि कुडाळ सचिव प्रा. अजित कानशिडे उपस्थित होते. या निवेदनात उत्सव, सण व मिरवणुका साजरे करण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचा आदर करतानाच, त्याचा सामान्य नागरिकांच्या शांतता, आरोग्य आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होऊ नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
विशेषतः कुडाळ पोलीस ठाणे ते कुडाळ एस.टी. बसस्थानक, जिजामाता चौक व परिसर या सुमारे ७५० मीटरच्या पट्ट्यात होणाऱ्या तीव्र ध्वनीप्रदूषणाकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. या परिसरात डीजे व कर्कश ध्वनिवर्धकांचा वापर, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
डीजे, ध्वनिवर्धक व इतर ध्वनीयंत्रणांचा वापर लागू असलेल्या ध्वनीमर्यादा आणि निर्धारित वेळेच्या नियमांनुसारच व्हावा, तसेच आवश्यक ठिकाणी अधिकृत यंत्रणेमार्फत डेसिबल मीटरने ध्वनीपातळी तपासून त्याची नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये, शासकीय कार्यालये यांसारख्या संवेदनशील परिसरांमध्ये विशेष खबरदारी घेण्याची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पूर्वनियोजित वाहतूक व्यवस्था करावी आणि रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने तसेच अन्य आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग कायम मोकळा ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
फटाक्यांच्या अतिरेकामुळे होणारे ध्वनी व वायूप्रदूषण कमी करण्यासाठीही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही पक्षपात न करता तात्काळ कायदेशीर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरे आणि ग्रामीण भागात समान नियम लागू करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“उत्सव साजरा करा; मात्र सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या,” या सकारात्मक भूमिकेतून हे निवेदन देण्यात आल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. उत्सव हे सामाजिक एकता, आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असून, एका समूहाच्या उत्सवाचा आनंद दुसऱ्या नागरिकाच्या शांतता, आरोग्य किंवा सुरक्षिततेच्या हक्कावर गदा आणणारा ठरू नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
हे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी कुडाळ, पोलीस निरीक्षक कुडाळ, तहसीलदार कुडाळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कुडाळ , जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये उपस्थित राहून वरीलप्रमाणे निवेदने देण्यात आली.






