NOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी !

कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४२, वर्ग ३) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. शुक्रवारी (४ सप्टेंबर) दुपारी नगरपंचायत कार्यालयात रचलेल्या सापळ्यात चांदीची अंगठी स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ‘पदमगड ज्वेलर्स’ हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडे अर्ज केला होता. या व्यवसायासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक नाटेकर याने १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी देण्याची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत नाटेकर याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.
त्यानंतर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता कुडाळ नगरपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे चांदीची अंगठी नाटेकर याच्याकडे दिल्यानंतर त्याने ती स्वीकारली. मात्र, त्याला संशय आल्याने त्याने एसीबीच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तक्रारदाराने ठरलेल्या संकेताद्वारे एसीबी पथकाला माहिती दिल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई केली. नाटेकर याच्या हातावर अँथ्रोसिन पावडरचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी नाटेकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक माळी व त्यांच्या पथकाने केली.
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग कार्यालयाशी ०२३६२-२२२२८९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९९२२८९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच टोल-फ्री क्रमांक १०६४ वरही तक्रार करता येईल.

error: Content is protected !!