दसऱ्याला शस्त्रपूजेसोबत वनराई बंधाऱ्यांचेही पूजन !

जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांचा सिद्धवाडीत अनोखा उपक्रम

श्रमदानातून दोन बंधाऱ्यांची उभारणी

दसऱ्याचा सण पारंपरिक शस्त्रपूजेसोबत जलसंधारणाचा संकल्प करून साजरा करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी एक अनोखा उपक्रम राबविला. त्यांच्या पुढाकारातून सिद्धवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या बंधाऱ्यांचे पूजन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. दादा साईल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी श्रमदानातून या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी बोलताना दादा साईल म्हणाले, “दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, आजच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे हीदेखील काळाची गरज आहे. त्यामुळे शस्त्रपूजेसोबतच जलसंधारणाचा संकल्प करून तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा हा प्रयत्न आहे.”
लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहिल्यास गावातील पाणीप्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गावाने अशा उपक्रमांतून पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही दादा साईल यांनी केले.
दसऱ्याच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची आणि जलसंवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम परिसरात लक्षवेधी ठरला आहे.

error: Content is protected !!