सिंधुदुर्गनगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील स्वयंचलित चाचणी केंद्राचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन

केंद्राच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती
सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे स्वयंचलित चाचणी केंद्राचे (एटीएस) उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेत स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वाहन चाचणी प्रक्रियेची पाहणी केली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची चाचणी अधिक अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टीने स्वयंचलित चाचणी केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून वाहन चाचणी प्रक्रियेत स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्यात येत असल्याने चाचणीतील अचूकता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनांची तांत्रिक स्थिती तपासण्याच्या प्रक्रियेला आधुनिक स्वरूप मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वयंचलित चाचणी यंत्रणेची कार्यपद्धती आणि वाहन चाचणी प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विजय काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई वालावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (ATS)-स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची योग्यता तपासणी आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रामध्ये वाहनांच्या तांत्रिक स्थितीचे वस्तुनिष्ठ, मानकीकृत पद्धतीने परीक्षण करण्यात येणार आहे. विशेषतः परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता तपासणी प्रक्रियेला अधिक कार्यक्षम बनविण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार रस्त्यावर धावताना वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्यता तपासणी महत्त्वाची असते. स्वयंचलित तपासणी प्रक्रियेमुळे वाहनांच्या विविध तांत्रिक बाबींचे निर्धारित निकषांनुसार परीक्षण करणे शक्य होणार असून, तपासणी प्रक्रियेत सुसूत्रता वाढण्यास मदत होणार आहे.






