सिंधुदुर्गात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त मोटरसायकल रॅलीचे उत्साहात स्वागत

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती; ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’च्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता परेडचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे सिंधुदुर्गात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रॅलीत लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथील पोलीस अधिकारी, अंमलदार व रायडर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याचा प्रसार करत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी समाजात व्यापक जनजागृती करणे आणि ‘ड्रग्जमुक्त भारत’चा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी रॅलीतील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व रायडर्सचे अभिनंदन करत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “या रॅलीच्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधातील अभियानाला जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर मोठे पाठबळ मिळेल. तसेच ड्रग्जमुक्त समाज निर्माण करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी अशी जनजागृती अत्यंत महत्त्वाची असून, या रॅलीमुळे अंमली पदार्थांविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळेल असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि एसएपी दीक्षित कुमार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






