कणकवली नगरपंचायत च्या जुन्या भाजी मार्केटच्या ठिकाणी व्यापारी संकुल करण्याचा मार्ग मोकळा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश
पहिल्या टप्प्यात 15 व उर्वरित टप्प्यात एकूण 40 गुंठे मध्ये भाजी मार्केट व्यापारी संकुल साकारणार
नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती
कणकवली : कणकवली शहरातील भाजी मार्केटसाठी नगरपंचायतच्या जुन्या भाजी मार्केटच्या जमिनीला लागून असलेली शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर महसूल विभागाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. कणकवली येथील सर्व्हे नं./हिस्सा नं. १९८ व २ मधील एकूण ०.०७.०० हेक्टर क्षेत्रापैकी ०.०३.९५ हेक्टर जमीन भाजी मार्केटसाठी देण्याचा प्रस्ताव नगरपंचायत मार्फत सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर शासनाकडून आदेश देण्यात आला असून यामुळे कणकवली नगरपंचायत चे पहिल्या टप्प्यातील 15 गुंठे जागेतील व्यापारी संकुल व भाजी मार्केट साकारण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. याकरिताचे 19 लाख रुपये भरणा केल्यानंतर ही जमीन नगरपंचायत ला हस्तांतरित केली जाणार आहे व त्या जागेवर पहिल्या टप्प्यात शहरातील फळ फुले व भाजी विक्री तसेच व्यापारी संकुलाच्या माध्यमातून कणकवली शहरातील पटवर्धन चौकात नगरपंचायत चे भव्य दिव्य असे व्यापारी संकुल मार्गी लागणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. नगराध्यक्ष व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी या शासकीय जमिनीवर भाजी मार्केट विकसित करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सदर जमीन शासकीय जमीन आरक्षण क्रमांक ५ अंतर्गत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या जमिनीच्या मागणीसाठी नमूद करण्यात आलेली बाजारमूल्याची रक्कम 19 लाख ४३१ रुपये इतकी आहे. ही रक्कम नगरपंचायतने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे भरणा करावी लागणार आहे. तसेच शासकीय जमिनीच्या वितरणासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय मर्यादेत हे प्रकरण येत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदर जागेवर भाजी मार्केट व व्यापारी संकुल करण्याकरिता पाठपुरावा केला होता. कणकवली तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेला होता. विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करता शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. शासनाकडून यावर सदर बाजार मूल्याप्रमाणे होणाऱ्या रकमेबाबत जिल्हाधिकारी स्तरावर याबाबतची कार्यवाही करण्याकरता प्रस्ताव हस्तांतरित केला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील मुख्य जागेचा प्रश्न आता सुटण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. सदर ठिकाणी 11 गुंठे क्षेत्र हे नगरपंचायत च्या मालकीचे असून उर्वरित आता हस्तांतरित होणारी 4 गुंठे जागा एकत्र आल्यानंतर एकूण 15 गुंठे मध्ये हे व्यापारी संकुल केले जाणार असल्याची माहिती श्री पारकर यांनी दिली. यानंतर सदरची या लगतची असलेली आरक्षणातील जागा एकत्र करून 40 गुंठे क्षेत्रात हे व्यापारी संकुल व भाजी मार्केट तसेच यामध्ये अन्य नाविन्यपूर्ण सुविधा देखील देण्याचा प्रयत्न केला जाणारा असल्याचे श्री पारकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून हा प्रश्न मार्गी लागला असून शहरात येत्या काळात अशा प्रकारे नाविन्यपूर्ण कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे देखील पारकर यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी






